Vande Bharat Express : आज सोमवार 26 मे 2025 रोजी देशाला एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होईल अशी माहिती समोर आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये पहिल्यांदा रुळावर धावली होती.
ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्यांदा चालवली गेली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. 2019 ते 2025 या कालावधीत देशातील अनेक राज्यांमध्ये ही गाडी सुरू झाली आहे.

आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर ही गाडी राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. तसेच येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रातील पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवर सुद्धा वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच आगामी काळात महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 13 वर पोहोचणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र शेजारील गुजरात राज्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
आज 26 मे रोजी गुजरात राज्याला एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असून यांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज नरेंद्र मोदी दोन नव्या एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये एका वंदे भारत एक्सप्रेस चा सुद्धा समावेश आहे.
PM मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
साबरमती-वेरावल या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे बोर्डाचे माहिती व प्रचार विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दिलीप कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, साबरमती-वेरावल वंदे भारत एक्सप्रेस साबरमती स्थानकाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिराजवळील वेरावल रेल्वे स्टेशन सोबत जोडणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे.
सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार हे सहा दिवस ही गाडी चालवली जाणार असून या गाडीला आठ कोच राहणार आहेत. या वंदे भारत एक्सप्रेसचा सोमनाथ येथे जाणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरी ट्रेन या मार्गावर धावणार
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आज पीएम मोदी साबरमती-वेरावल वंदे भारत एक्सप्रेस सोबतच वलसाड-दाहोद एक्सप्रेसला सुद्धा हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी वलसाड आणि दाहोद दरम्यान दररोज चालवली जाणार आहे.
ही 17 डब्यांची एक्सप्रेस ट्रेन राहणार आहे. वलसाडहून ट्रेन क्रमांक 19011 सोडली जाणार आहे तर दुसरीकडे ट्रेन क्रमांक 19012 दाहोद वरून सोडली जाणार आहे.
ही सेवा आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार अशी माहिती देण्यात आली आहे. वलसाड – दाहोद यादरम्यानचे 346 किलोमीटरचे अंतर ही गाडी जलद गतीने पार करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.