Vande Bharat News : वंदे भारत एक्सप्रेस ही 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी देशातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाले आणि ही गाडी सुरुवातीला नवी दिल्ली ते या वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली. या गाडीमुळे नवी दिल्ली ते वाराणसी हा प्रवास वेगवान झाला आणि प्रवाशांकडून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला.
हेच कारण आहे की 2019 नंतर जलद गतीने या गाडीचा विस्तार करण्यात आला. सध्या स्थितीला देशात 144 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 मार्गांवर 22 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेकडून आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते. वंदे भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावते आणि या गाडीमध्ये प्रवाशांना सर्वच वर्ल्ड क्लास सोयी सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे प्रवाशांना जलद आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येतोय.
हेच कारण आहे की वंदे भारत ट्रेनला मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या महाराष्ट्रात आणि बिहार मध्ये किती वंदे भारत ट्रेन सुरू आहेत याची माहिती पाहणार आहोत. बिहार आणि महाराष्ट्र यापैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वंदे भारत आहेत याबाबत आज आपण येथे माहिती पाहूयात.
महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत
महाराष्ट्रात सध्या 22 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर या 22 गाड्या सुरू आहेत. राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते जालना,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपुर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या अकरा मार्गांवर वंदे भारत ट्रेनचे यशस्वी संचालन सुरू आहे.
या सर्व वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय आणि हेच कारण आहे की आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. मध्यंतरी मीडिया रिपोर्ट मध्ये महाराष्ट्रातून आगामी काळात चार नव्या वंदे भारत ट्रेन सुरू होणार असा दावा करण्यात आला होता.
बिहार मध्ये किती वंदे भारत ट्रेन सुरू आहेत?
बिहारमध्ये सध्या दहा महत्त्वाच्या मार्गांवर वीस वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. म्हणजे बिहार पेक्षा आपल्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या अधिक आहे. रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये पाटलिपुत्र ते गोरखपुर, पटना ते रांची, टाटानगर ते पटना, न्यू जलपाईगुडी ते पटना, हावडा ते भागलपुर, हावडा ते गया, पटना ते गोमती नगर,
हावडा ते पटना आणि टाटानगर रेल्वे स्टेशन ते पटना या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. यातील टाटानगर रेल्वे स्टेशन ते पटना या मार्गांवर चार वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. गाडी क्रमांक 20983/84 आणि 21893/94 या गाड्या टाटानगर ते पटना दरम्यान चालवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.