Vande Bharat Railway : भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा सुरू आहे. ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली. सगळ्यात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि तेव्हापासून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. सध्या देशातील 65 पेक्षा अधिक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आगामी काळातही देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर सध्या राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

राज्यातील मुंबई येथील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर , सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
या गाडीच्या वेगाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी 160 ते 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते. मात्र ही गाडी जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन नाही. मग तुम्हाला जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन कोणती याबाबत माहिती आहे का? नाही, मग आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ही आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन
भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वाधिक वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाते. मात्र ही गाडी जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनच्या यादीत येत नाही. जपान मधील SC Maglev ही ट्रेन जगातील सर्वात वेगवान रेल्वे गाडी म्हणून ओळखली जाते.
वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी आणि शताब्दी या गाड्यांपेक्षा जपान मधील या ट्रेनचा वेग फारच अधिक आहे. मीडिया रिपोर्टनुसार जपान मधील या वेगवान ट्रेनचा वेग 603 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
जगातील दुसरी वेगवान ट्रेन कुठे धावते?
जगातील दुसरी वेगवान ट्रेन सुद्धा जपानमध्येच सुरु आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जपान या देशातील JR Maglev MLX-01 ही हायटेक ट्रेन जगातील दुसरी वेगवान ट्रेन असल्याचा दावा जपानकडून करण्यात आला असून या ट्रेनचा वेग प्रतितास 581 किमी इतका आहे.
सध्या ही ट्रेन जपानमधील मोजक्याच शहरात धावत आहे पण येत्या काही वर्षांनी जपानमध्ये सर्वत्र ही ट्रेन चालवण्यासाठी तेथील सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
फ्रान्स आणि चायना मध्येही सुरु आहेत वेगवान ट्रेन
याशिवाय जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फ्रेंच मधील TGV ट्रेनचा नंबर लागतो. फ्रान्स देशातील ही रेल्वेगाडी जगातील तिसरी सर्वात वेगवान ट्रेन असल्याचा दावा केला जात आहे. या जगातील तिसऱ्या वेगवान एक्सप्रेसचा वेग 575 किमी प्रतितास इतका आहे.
दुसरीकडे चायनाने देखील एक नवीन रेल्वे गाडी सुरू केली आहे. सीआर 450 या हायस्पीड रेल्वेची नुकतीच चायना मध्ये चाचणी पूर्ण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर जर विश्वास ठेवला तर चायना मध्ये चाचणी झालेल्या या रेल्वेचा वेग प्रतितास 400 ते 450 इतका आहे.
चायना मध्ये फुजियान प्रांतात सर्वात वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक अशा या हाय-स्पीड ट्रेनची यशस्वी चाचणी नुकतीच संपन्न झाली आहे. ही ट्रेन फुझोऊ ते क्वानझोऊ दरम्यान प्रतितास 450 किमी वेगाने धावली असल्याचा दावा चायना मीडियाकडून करण्यात आला आहे.
मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त तीन तासात
दरम्यान चायना मध्ये चाचणी झालेली ही गाडी जर आपल्या भारतात सुरू झाली तर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होऊ शकतो. चीनने अलीकडेचं अल्ट्रा हायस्पीड मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी केली आहे. ही ट्रेन लो वॅक्युम पाईपलाईनमधून धावत आहे.
नक्कीच जपान, चायना आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये ज्या हायस्पीड ट्रेन सुरू आहेत तशा ट्रेन आपल्या भारतात चालू झाल्या तर भारतीयांचा रेल्वे प्रवास फारच वेगवान होणार आहे.
यामुळे देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अगदीच काही मिनिटात पोहोचता येणार आहे. मात्र भारतातील रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहता आगामी काही वर्ष तरी अशा वेगवान गाड्या आपल्या देशात धावताना दिसण्याची शक्यता कमीच आहे.