Vande Bharat Sleeper Train : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात. खरे तर, सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या गाडीची कधी तिकीटदरामुळे तर कधी गाडीमध्ये मिळणाऱ्या जेवणामुळे चर्चा होत असते.
या गाडीचा वेग आणि यात असणाऱ्या वर्ल्डक्लास सोयी सुविधा देखील चर्चेचा विषय ठरतात. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
सध्या जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे ती चेअर कार प्रकारातील आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस अजून सुरू झालेली नाही. पण, भारतीय रेल्वे लवकरच देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे.
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. सेमी-हाय-स्पीड ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) वर चालवली जाईल आणि प्रवाशांना आधुनिक सुविधांसह उत्तम प्रवासाचा अनुभव मिळेल.
BEML द्वारे निर्मित वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या आणि रात्रभर प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रेनचा नमुना सप्टेंबर 2024 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केला होता.
जानेवारी 2025 मध्ये नवी दिल्ली ते श्रीनगर या मार्गांवर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. या गाडीला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती हाती आली आहे.
नवी दिल्ली ते श्रीनगर हे 800 किलोमीटरचे अंतर या गाडीमुळे फक्त 13 तासात कापले जाणार आहे. नवी दिल्ली ते काश्मीर घाटी दरम्यान सुरू होणारी ही देशातील पहिलीच रेल्वे राहणार आहे. या गाडीच्या तिकीट दरा बाबत बोलायचं झालं तर प्रवाशांना दोन ते तीन हजार रुपये खर्च करावे लागू शकतात.
ही गाडी राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून सायंकाळी सात वाजता सोडली जाणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ही गाडी श्रीनगरला पोहोचेल. ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेऊ शकते अस बोललं जात आहे.