Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. ही ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या ही गाडी देशातील अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.
आपल्या राज्याला सुद्धा या गाडीचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रातून 11 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. अशातच आता देशाला आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरे तर काश्मीरमध्ये अजूनही वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नाही मात्र आता काश्मीर खोऱ्याची वंदे भारत ट्रेनची मागणी पूर्ण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी काश्मीरसाठी पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची बातमी समोर आली आहे. या ट्रेनच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत पण ही ट्रेन सुरू कधी होणार हा मोठा सवाल होता. दरम्यान आता या ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख समोर आल्याने काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
काश्मीर साठी किंबहुना संपूर्ण देशासाठी हा एक मोठा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन कटरा येथे करण्यात आले असून, यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नव्या सेवेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वे संपर्क अधिक बळकट होणार असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
सध्या काश्मीरमध्ये रेल्वे सेवा केवळ संगलदान ते बारामुल्ला या विभागापुरती मर्यादित आहे, तर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या कटरा येथेच थांबतात. पण ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर कटरा ते बारामुल्ला अशी सेवा मिळेल, ज्यामुळे प्रथमच प्रवाशांना थेट रेल्वेने काश्मीरपर्यंत जाण्याची संधी मिळणार आहे.
भविष्यात ही सेवा जम्मूपर्यंतही वाढवली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक ज्याला USBRL म्हणतात याच प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत 272 किमी लांबीचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला असून, त्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिनाब ब्रिजचाही समावेश आहे.
दरम्यान याच 272 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर आता देशातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन धावणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी या ट्रेनचे उद्घाटन करण्याच्या आदल्या दिवशी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करणार आहेत.
उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी या पुलाची पाहणी करणार असून, त्यांना याच्या बांधकामासंबंधी सविस्तर माहिती देण्यात येईल, असे सांगितले गेले आहे. या ऐतिहासिक घटनेनंतर कटरा येथे मोदी यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे औपचारिक उद्घाटन होईल आणि त्यानंतर ते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना आणि जनतेला संबोधित करणार आहेत. एकंदरीत भारतातील वंदे भारत नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावतात?
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर सध्या वंदे भारत ट्रेन सुरू असून लवकरच राज्यातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.