गव्हाच्या ‘या’ 4 जातीच्या लागवडीतून मिळणार विक्रमी उत्पादन ! कमी खर्चात मिळणार 50 क्विंटल पर्यंत उत्पादन

Wheat Farming : तुम्हालाही येत्या रब्बी हंगामात गव्हाची लागवड करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण गव्हाच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर कोरडवाहू भागात गव्हाची पेरणी आधीच पूर्ण झाली असेल.

कोरडवाहू भागात गव्हाची पेरणी ही ऑक्टोबर महिन्यात सुरू होते आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जवळपास पेरणी पूर्ण होऊन जाते. दरम्यान आता शेतकरी बांधव वेळेवर पेरणीसाठी लगबग करणार आहेत. बागायती भागात साधारणता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वेळेवर गहू पेरणीला सुरुवात होते.

गहू हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. याची लागवड पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते यासोबतच महाराष्ट्रातही रब्बी हंगामामध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल अशा गव्हाच्या टॉप 4 जातींची माहिती पाहणार आहोत. आता आपण कमी खर्चात 50 क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता असणाऱ्या काही प्रमुख वाणाची माहिती पाहुयात.

गव्हाच्या टॉप चार सुधारित जाती

गोदावरी (एनआयडीडब्ल्यू : 295) – वेळेवर गव्हाची पेरणी करायची असेल तर गोदावरी तुमच्या यादीत असायलाच हवे. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या जातीचे पीक साधारणता 110 ते 115 दिवसांमध्ये परिपक्व होते.

त्र्यंबक (एनअयएडब्ल्यू 301) – शेतकऱ्यांना या जातीपासूनही हेक्टरी 40 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा तज्ञांकडून केला जातो. या जातीचा पीक परिपक्व कालावधी सुद्धा साधारणता 110 ते 115 दिवस आहे.

बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी उत्कृष्ट असा सरबती वाण म्हणून या जातीचा मोठा दबदबा आहे. हा वाण तांबेरा रोगासाठी मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो.

तपोवन (एनआयएडब्ल्यू 917) – या जातीपासूनही शेतकऱ्यांना साधारणतः 45 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी तज्ञांकडून करण्यात आला आहे.

तांबेरा रोगास प्रतिकारक असणारा हा वाण साधारणतः 115 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होतो. नक्कीच कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा हा वाण शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

फुले समाधान (एनआयएडब्ल्यू 1994) – महाराष्ट्रातील हा एकमेव असा वाण आहे जो वेळेवर पेरणी करण्यासाठी पण चालतो आणि उशिरा पेरणीसाठी पण चालतो. या जातीपासूनही शेतकऱ्यांना हेक्टरी 45 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

या जातीचे पीक साधारणता 120 दिवसांमध्ये परिपक्व होते. मावा किडीस आणि तांबेरा रोगास प्रतिकारक असणारा हा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.