Wheat Farming : आगामी रब्बी हंगामात गव्हाची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी देशातील शेतकऱ्यांचे गहू उत्पादन वाढवण्यासाठी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. या गव्हाच्या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे गव्हाचे हे नवीन वाण अवघ्या 120 ते 130 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होते. या जातीचे पीक उत्पादित करण्यासाठी खूपच कमी खर्च करावा लागतो. अर्थातच या जातीच्या शेतीमधून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पादन मिळणार आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) ने HD 3410 या सुधारित गव्हाचे वाण सादर केले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये गव्हाची हे वाण लाँच करण्यात आले होते आणि नंतर केंद्रानेही या वाणाला मान्यता दिली. गव्हाचा हा वाण बागायती भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
गव्हाचा हा नव्याने विकसित करण्यात आलेला वाण विविध कीटक आणि रोगांसाठी प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. इतर सामान्य गव्हाच्या तुलनेत या जातीचे पीक लवकर परिपक्व होते.
खरे तर या जातीचे पीक हे कमी पाण्यात सुद्धा उत्पादित होऊ शकते. मात्र, अधिक काळ पाणी भेटले नाही, उशिराने सिंचन केले गेले तर उत्पादनात घट येण्याची भीती असते. यामुळे कोरडवाहू भागात या जातीची लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.
कोरडवाहू भागात याची लागवड केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळे बागायती भागात आणि वेळेवर या जातीची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गव्हाच्या इतर सामान्य जाती 145 दिवसांपेक्षा अधिक काळात तयार होतात मात्र गव्हाची ही अलीकडेच विकसित झालेली सुधारित जात अवघ्या १२० ते १३० दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते आणि विशेष म्हणजे 67 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन देखील या जातीपासून मिळते.
इतर सामान्य जाती मात्र फक्त 60 ते 63 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहेत. गव्हाच्या या जातीच्या रोपांची उंची ही साधारणतः 100 ते 105 cm एवढी असते.