LPG Gas Subsidy : एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. एलपीजी गॅस सबसिडी बाबत शासनाकडून काही नवे निर्णय घेतले जाणार आहेत आणि या निर्णयाचा थेट एलपीजी गॅस ग्राहकांवर परिणाम होणार अशी माहिती समोर येत आहे. केंद्र सरकार एलपीजी सबसिडीच्या धोरणात मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. देशातील घरगुती एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाचा भार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार लक्षात घेता सबसिडीच्या गणनेच्या पद्धतीचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. आतापर्यंत भारतातील एलपीजी सबसिडीची गणना प्रामुख्याने सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइसच्या आधारे केली जात होती. पश्चिम आशियातील एलपीजी पुरवठ्यासाठी हा दर अनेक वर्षे मानक बेंचमार्क म्हणून वापरला जात आहे. मात्र आता या सूत्रात बदल करून अमेरिकन बेंचमार्क किंमत तसेच ट्रान्सअटलांटिक शिपमेंटवरील उच्च वाहतूक खर्चाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिकेमधून एलपीजी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सवलत मिळाली तरच हा पर्याय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरू शकतो. कारण अमेरिकेतून एलपीजी आयात करण्याचा मालवाहतूक खर्च सौदी अरेबियाच्या तुलनेत अंदाजे चार पट जास्त आहे. त्यामुळे सवलत, वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव यांचा समतोल राखत सबसिडीचे नवे गणित ठरवावे लागणार आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात देशातील तीन प्रमुख सरकारी तेल कंपन्या—इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड—यांनी अमेरिकन निर्यातदारांसोबत महत्त्वाचा करार केला आहे. या करारानुसार २०२६ वर्षासाठी दरवर्षी २.२ दशलक्ष मेट्रिक टन एलपीजी आयात करण्याचे ठरले आहे. हा करार भारतातील एलपीजी पुरवठा साखळी अधिक स्थिर करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
तज्ञांच्या मते, जागतिक ऊर्जा बाजारात सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडी, पुरवठ्यातील विविधीकरण आणि वाढती मागणी यामुळे एलपीजी आयातीसाठी पर्यायी स्रोतांचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. सरकारकडून सबसिडीच्या नवीन सूत्रावर सविस्तर विचार सुरू असून अंतिम निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत एलपीजी सबसिडीबाबत सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात एलपीजी गॅस सबसिडी बंद होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.