महिलांसाठी सरकारची विशेष योजना, ‘या’ कामासाठी मिळणार 25 लाख रुपयांचे कर्ज, कुठं करणार अर्ज ? वाचा सविस्तर

Women Scheme : केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी आतापर्यंत शासनाने शेकडो योजना चालवल्या आहेत. या योजनांमुळे महिला सक्षमीकरणाचा हेतू साध्य करण्यात मोठी मदत होत आहे.

स्त्री शक्ती योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जात असून या अंतर्गत महिला उद्योजकांना कर्ज पुरवले जात आहे.

राज्य सरकारच्या उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत नोंदणीकृत महिलांना या योजनेच्या माध्यमातून 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेच्या स्वरूप आणि पात्रता तसेच या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या योजनेचे स्वरूप कसे आहे ?

ही योजना केंद्र शासन स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबवत आहे. या योजनेचा लाभ राज्य सरकारच्या उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत नोंदणीकृत महिलांना दिला जात आहे.

या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात असून या कर्जावर आकारले जाणारे व्याजदर देखील कमी आहे. महिलांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

किती व्याजदर आकारले जाते ?

या योजनेअंतर्गत कमाल 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. यासाठी मात्र सदर महिलेकडे व्यवसायाची 50% मालमत्ता असणे आवश्यक आहे. यामध्ये दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज घेणाऱ्या महिलांना 0.5% एवढी व्याज सवलत दिले जाते.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांसाठी कर्ज मर्यादा 50 हजार रुपयांपासून 25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत किमान 50 हजार रुपयांचे कर्ज मिळते.

तसेच या योजनेअंतर्गत कमाल 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाहमी उपलब्ध होते. म्हणजे पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीच हमी घेतली जात नाही.

अर्ज कुठे करावा लागतो

या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी महिला त्यांच्या जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भेट देऊ शकतात. कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भेट देऊन या कर्जासाठी अर्ज केला जाऊ शकतो.

कोण-कोणती कागदपत्रे लागतात

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी अर्ज करणे हेतू पात्र महिलांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते तपशील, ई – मेल आयडी, मोबाईल नंबर, व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात.