Shubman Gill कसा बनला क्रिकेटचा सुपरस्टार ? जाणून घ्या शेतकऱ्याचा मुलगा ते जगातील नंबर १ फलंदाजाची कहाणी

Published on -

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे शुभमन गिल. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने अल्पावधीतच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वतःचे नाव मोठ्या दिग्गज खेळाडूंसोबत नोंदवले आहे. परंतु एक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला शुभमन गिल नंबर १ फलंदाज कसा बनला? त्याचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

मोठ्या स्वप्नांचा प्रवास

शुभमन गिलचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे आजोबा दिदार सिंग गिल आणि वडील लखविंदर गिल हे दोघेही शेतकरी होते. परंतु लखविंदर गिल यांना आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचे होते. त्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि शुभमन आठ वर्षांचा असताना ते मोहालीला स्थलांतरित झाले.

मोहालीत आल्यावर शुभमन गिलला मोहाली क्रिकेट अकादमीमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी गिल अवघ्या आठ वर्षांचा होता, पण त्याचा क्रिकेटविषयीचा उत्साह आणि मेहनतीची तयारी ही मोठ्या खेळाडूंच्या तोडीस तोड होती. तो दररोज पहाटे ३:३० वाजता उठायचा आणि ४ वाजता अकादमीत पोहोचून सराव सुरू करायचा. दोन तास कठोर मेहनतीनंतर तो शाळेला जायचा. शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्याने फक्त १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि पूर्णवेळ क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले.

असे बदलले गिलचे नशीब

शुभमन गिलच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना म्हणजे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांची त्याच्यावर पडलेली नजर. घावरी बीसीसीआयच्या वतीने युवा वेगवान गोलंदाज शोधण्याच्या मोहिमेवर होते. मात्र, मोहाली क्रिकेट अकादमीत एका नेट सेशनदरम्यान त्यांना एक प्रतिभावान फलंदाज दिसला – तो म्हणजे शुभमन गिल! घावरींनी गिलच्या वडिलांना शुभमनला अधिकाधिक संधी द्यायला सांगितले. वयाच्या ११व्या वर्षीच तो भारताच्या १९ वर्षांखालील संघातील गोलंदाजांच्या चेंडूंवर सराव करू लागला. यामुळे त्याच्या फलंदाजीत अजूनच सुधारणा झाली आणि तो भारतीय क्रिकेटच्या यशस्वी प्रवासाकडे वाटचाल करू लागला.

वनडे क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज

आज शुभमन गिल जगातील सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने २०२३ आणि २०२४ या वर्षांमध्ये अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये शतके ठोकली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये गिल भावी सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे. त्याच्या फॉर्म आणि प्रतिभेवरून तो महोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसण्यास तयार आहे.

‘स्पायडर-मॅन’शी असलेलं नातं!

शुभमन गिल केवळ क्रिकेटपटूच नाही, तर तो मनोरंजन क्षेत्राशीही जोडला गेला आहे. त्याला ‘स्पायडर-मॅन’ हे पात्र प्रचंड आवडते. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या अॅनिमेटेड चित्रपटासाठी त्याने हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये ‘पवित्र प्रभाकर’ या पात्रासाठी आवाज दिला होता. क्रिकेटशिवाय अशा प्रकारे त्याने त्याच्या वेगळ्या छंदालाही वाव दिला आहे.

भविष्यातील भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार?

गिलच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार बनू शकतो, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. त्याची खेळातील परिपक्वता, संयम आणि कठोर मेहनत यामुळे तो लवकरच भारतीय संघाचा प्रमुख चेहरा बनेल.

संघर्ष, मेहनत आणि यशाचा फॉर्म्युला

शुभमन गिलने आपल्या मेहनतीच्या जोरावर आजच्या घडीला क्रिकेट विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने भारताच्या युवा क्रिकेटपटूंना एक प्रेरणादायी उदाहरण दिले आहे की, मेहनत आणि समर्पण असेल तर कोणतंही लक्ष्य गाठणं अशक्य नाही.

शुभमन गिलची प्रेरणादायी कहाणी

शुभमन गिलची कहाणी एका शेतकऱ्याच्या मुलाने मेहनतीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये नंबर १ फलंदाज बनण्याची प्रेरणादायी गाथा आहे. लहान वयातच क्रिकेटमध्ये चमकदार कारकीर्द घडवणारा हा खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार ठरेल, यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe