Sports News : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास उरले असताना सचिन तेंडुलकरवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
तेंडुलकरला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक राजदूत म्हणून घोषित करण्यात आले आहे. एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या काही तास आधी ही घोषणा करण्यात आली आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटन सामन्यापूर्वी सचिन विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा करेल.
ही घोषणा झाल्यानंतर सचिनने प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणतो ”१९८७ साली भारतात पहिला विश्वचषक झाला तेव्हा मी बॉल बॉय होतो. पण त्यानंतर मला सहा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करता आले.
विश्वचषकाचं माझ्या मनात नेहमीच वेगळं स्थान आहे. भारताने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता आणि हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे. यंदाच्या विश्वचषकासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत.
मीही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. हा विश्वचषक तरुण मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांना या स्पर्धेतून खूप काही शिकता येईल. त्यामुळे तरुण पिढीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. मला आशा आहे की संघातील सर्व खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील.”
यंदा विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत.
हे सामने १० ठिकाणी खेळवले जातील. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
वेस्ट इंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांची आतापर्यंत क्रिकेट विश्वचषकात आयसीसीचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता सचिन तेंडुलकर ही जबाबदारी पार पाडेल.