भारतानं अवघ्या ६.३ षटकांत जिंकला स्कॉटलंड विरुद्धचा सामना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने स्कॉटलंडचा आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही जिवंत ठेवली आहे.

कप्तान विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला.

भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावातच गारद झाला. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानावर जास्त काळ टिकू दिले नाही.

प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दे-दणादण फटकेबाजी केली. राहुलने १८ चेंडूत अर्धशतक ठोकल्यामुळे भारताने हे आव्हान ६.३ षटकातंच ओलांडले.

या विजयामुळे भारताने नेट रनरेटमध्ये मोठी कमाई केली. त्यांनी ग्रुप बी मध्ये सर्वात चांगला रनरेट मिळवला. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याकडे लागले आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पाडाव केला, तर भारताचा मार्ग सुकर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe