भारतीय क्रिकेट संघाचा युवा आणि तडाखेबाज फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने १२९ चेंडूत नाबाद १०१ धावा करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ८ वे शतक झळकावले. त्याच्या या दमदार खेळासाठी त्याला सामनावीर (Man of the Match) म्हणून निवडण्यात आले.
गिलच्या या अद्भुत खेळीचे क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. विशेषतः पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याने गिलबद्दल मोठे विधान केले आहे. टेन स्पोर्ट्सशी बोलताना अक्रम म्हणाला, “मी आधीही सांगितले आहे की शुभमन गिल हा जागतिक क्रिकेटमधील पुढचा महान खेळाडू आहे.”

वसीम अक्रमने शुभमन गिलचे केले कौतुक
वसीम अक्रम म्हणाला, “शुभमन गिलने खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार फलंदाजी केली. जरी त्याने १२९ चेंडू खेळले, तरीही त्याचा खेळ सामन्याच्या परिस्थितीला साजेसा होता. त्याने संपूर्ण डाव जबाबदारीने आणि खेळपट्टीच्या गरजेनुसार सांभाळला. हाच तो गुण आहे, जो गिलला इतर फलंदाजांपेक्षा वेगळा बनवतो.” तो पुढे म्हणतो, “चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा त्याचा पहिलाच सामना होता आणि त्याने तुफान शतक झळकावले. माझ्या मते, गिल सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे.”
भारताचा विजय सोपा केला
बांगलादेशने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २२८ धावांवर सर्वबाद मजल मारली. बांगलादेशकडून तौहिद हृदयाने १०७ धावांचे शानदार शतक झळकावले, परंतु भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मोहम्मद शमीने ५३ धावांत ५ बळी घेतले आणि भारतीय संघासाठी विजयाचा मार्ग सुकर केला. भारतीय संघाने सहज विजय मिळवत २२९ धावांचे लक्ष्य फक्त ४८.२ षटकांत पूर्ण केले. शुभमन गिलने जबाबदारीने फलंदाजी करत नाबाद १०१ धावा केल्या, तर त्याला इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली.
भारतीय संघासाठी महत्त्व
शुभमन गिल हा भारतीय संघाचा भविष्याचा स्टार म्हणून ओळखला जात आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांनंतर भारतीय क्रिकेटचा पुढचा महान खेळाडू कोण? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या पार्श्वभूमीवर वसीम अक्रमसारख्या दिग्गजाने गिलबद्दल मोठे विधान करणे, हे त्याच्या गुणांवरची मोठी पावती आहे. गिलने याआधीही आपल्या खेळीने अनेक वेळा भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आतापर्यंतच्या 50 पेक्षा जास्त वनडे सामन्यांमध्ये सरासरी 60+ ने धावा केल्या आहेत. त्याच्या फलंदाजीची शैली, संयम, तंत्र आणि स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता यामुळे तो सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम युवा फलंदाज मानला जातो.