IPL vs PSL | जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग म्हणजे आयपीएल, आणि त्याच्या लोकप्रियतेला तोड नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. धोनीपासून कोहलीपर्यंत मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या माध्यमातून जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. अशा वेळी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. त्याने असा दावा केला आहे की लवकरच लोक आयपीएल सोडून पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीगकडे वळतील.
हसन अलीचा दावा-
हसन अलीने म्हटले की, “जर खेळाडूंनी पीएसएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर प्रेक्षक आयपीएल पाहणे बंद करतील आणि पीएसएलला पसंती देतील.” त्याच्या म्हणण्यानुसार, चांगली कामगिरी आणि मनोरंजन हेच प्रेक्षकांना आकर्षित करतात. मात्र, हे विधान अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे, कारण आयपीएलचा प्रभाव आणि ग्लॅमर आजही अढळ आहे.

पीएसएलबद्दल बोलायचे झाले, तर ही लीग अजूनही प्रस्थापित होत आहे. 11 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या पीएसएलचे हे 10 वे पर्व आहे, ज्यामध्ये 6 संघ सहभागी होतात. तर आयपीएलमध्ये यंदा 10 संघ सहभागी असून 74 सामने खेळवले जातात. शिवाय, आयपीएलमध्ये जगभरातील टॉप खेळाडूंना मोठ्या रकमा दिल्या जातात, त्यामुळे बहुतेक क्रिकेटपटू आयपीएललाच प्राधान्य देतात.
हसन अलीने पीएसएलमध्ये आतापर्यंत 82 सामने खेळून 108 विकेट्स घेतल्या आहेत. तो इस्लामाबाद युनायटेड, पेशावर झल्मी आणि मुलतान सुल्तान्स यांसारख्या संघांसोबत खेळला आहे. मात्र, त्याचे विधान ‘लोक आयपीएल सोडून पीएसएल पाहतील’ यावर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
IPL ला इतकी प्रसिद्धी का?
जगभरातील स्टार खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतात.सामना प्रेझेंटेशन, ग्राफिक्स, ब्रॉडकास्ट क्वालिटी उच्च दर्जाची असते. आयपीएलमध्ये सामन्यांची संख्या अधिक असते आणि ते देशभरातील विविध शहरांमध्ये खेळले जातात. याचबरोबर मोठे स्पॉन्सर आणि ग्लॅमरस इव्हेंट्स देखील असतात.
आता जर पीएसएलची तुलना केली तर त्याला आयपीएलपेक्षा कमी ग्लॅमर आहे. क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर हसन अलीच्या या विधानाची खिल्ली उडवली असून अनेकांनी म्हटले की, “हा केवळ एक भ्रम आहे.”