पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांपासून भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. अशात दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारवर दबाव आणून भारतावर हल्ला करण्याचे मनसुबे आखले आहेत. या संभाव्य युद्धानंतर काल आयपीएलचा धर्मशाला येथे सुरु असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना अर्धवट रद्द करावा लागला. त्यामुळे आता आयपीएलची स्पर्धाच रद्द होते का, या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नेमकं काय झालं?
सीमावर्ती भागापासून 150 किमी लांब असलेल्या धर्मशाळे मैदानावर गुरुवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. हा सामना अर्धवट स्थितीत थांबवावा लागला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. याच मैदानावर 11 मे रोजी होणारा सामनाही दुसरीकडे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. भारत-पाकिस्तानमधील तणाव व युद्धाची स्थिती पाहता आयपीएलच्या पुढील सामन्यांबाबत आज बीसीसीआयची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आयपीएल स्पर्धाच रद्द होणार?
धर्मशाला येथील सामना रद्द केल्यानंतर आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, स्पर्धा सुरु ठेवायची की नाही याबाबत सरकारच्या सूचनांची वाट पाहिली जात आहे. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवायचे की पुढे ढकलायचे हा निर्णय सरकारच्या हाती आहे. पण क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक पाहता बीसीसीआयला ही स्पर्धा काहीही करून आताच पूर्ण करणं भाग आहे. कारण त्यानंतर उर्वरित सामने पूर्ण करणं कठीण होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय आहेत पर्याय?
1. तणावाच्या परिस्थितीत बीसीसीआय पुढे स्पर्धांची ठिकाणे बदलण्याचे पर्यात आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या होम आणि अवे फॉर्मेटवर परिणाम होईल, परंतु स्पर्धा सीमाक्षेत्रापासून दूर खेळवली जाऊ शकते.
2. बीसीसीआय आयपीएल स्पर्धा दुसऱ्या देशातही खेळवू शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतही इतर देशांचा पर्याय शोधू शकते.
3. आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा शेवटचा पर्यात बीसीसीआयच्या हाती असू शकतो.