Airtel Update : देशातील दुसरी मोठी आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या लाखो ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअरटेलने Perplexity Pro या एआय-आधारित प्रीमियम सर्व्हिसचे मोफत सब्सक्रिप्शन आता बंद केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अनेक युजर्स नाराज झाले असून सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
एअरटेलने 2025 मध्ये आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी Perplexity Pro ची मोफत ऑफर सुरू केली होती. ही ऑफर लाँच करतानाच कंपनीने स्पष्ट केले होते की, ही सुविधा मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल आणि कायमस्वरूपी मोफत देण्यात येणार नाही.

कंपनीच्या अटींनुसार ही ऑफर 16 जानेवारी 2026 पर्यंतच वैध होती. आता ठरलेल्या वेळेनंतर एअरटेलने ही ऑफर अधिकृतपणे बंद केली आहे.
Perplexity Pro हा एक प्रीमियम एआय टूल असून, संशोधन, माहिती शोध, कंटेंट जनरेशन यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या सब्सक्रिप्शनची वार्षिक किंमत तब्बल 17,000 रुपये आहे.
एवढी महागडी सेवा एअरटेल आपल्या युजर्सना मोफत देत असल्याने ही ऑफर खूपच लोकप्रिय ठरली होती. मात्र आता नवीन ग्राहकांसाठी ही संधी पूर्णपणे बंद झाली आहे.
एअरटेलने स्पष्ट केले आहे की, ज्या ग्राहकांनी ऑफर कालावधी संपण्यापूर्वी Perplexity Pro प्लॅन रिडीम केला आहे, ते ग्राहक पुढील एक वर्षापर्यंत या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यांचा अॅक्सेस पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. मात्र ज्यांनी वेळेत हा प्लॅन क्लेम केला नाही, त्यांना आता ही सुविधा मोफत मिळणार नाही.
दरम्यान, Perplexity Pro वापरणाऱ्या युजर्ससाठी आणखी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. फ्री ट्रायल किंवा मोफत कालावधी संपल्यानंतर जर सब्सक्रिप्शन रद्द केले नाही, तर प्लॅन आपोआप पेड मोडमध्ये रिन्यू होईल आणि शुल्क आकारले जाईल.
त्यामुळे ज्या ग्राहकांना पैसे खर्च करायचे नाहीत, त्यांनी वेळेत बिलिंग सेटिंग तपासून सब्सक्रिप्शन रद्द करणे आवश्यक आहे.
एकंदरीत, एअरटेलचा हा निर्णय अपेक्षित असला तरी अनेक युजर्ससाठी तो धक्कादायक ठरला आहे.













