iPhone 17 vs iPhone 16:- अॅपलच्या आगामी येऊ घातलेल्या आयफोन 17 मॉडेलबाबत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे नवीन आयफोनमध्ये डिझाइन, डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरा यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत सुधारणा अपेक्षित आहेत. जर तुम्ही आयफोन १६ वापरत असाल आणि अपग्रेड करायचे की नाही याचा विचार करत असाल तर दोन्ही मॉडेल्समधील महत्त्वाचे फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
आयफोन 16 आणि आयफोन 17 मधील फरक
डिझाइन आणि डिस्प्ले सुधारणा
आयफोन 17 च्या डिझाइनमध्ये अॅपलचा सिग्नेचर स्लीक लूक कायम राहील. मात्र यात हलके बदल पाहायला मिळू शकतात. सध्याच्या लीकनुसार आयफोन 16 च्या तुलनेत नवीन मॉडेलचा डिस्प्ले किंचित मोठा म्हणजेच 6.3-इंच OLED असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये अधिक उच्च रिझोल्यूशन (1200 x 2600 पिक्सेल) देण्यात येईल.ज्यामुळे व्हिज्युअल अनुभव अधिक स्पष्ट होईल. याशिवाय Apple ने बेझल (फ्रेम) आणखी कमी करण्याची शक्यता आहे. तसेच लहान नॉच किंवा डायनॅमिक आयलंड फिचर अधिक प्रगत स्वरूपात सादर होऊ शकते.
कार्यक्षमता आणि प्रोसेसर अपग्रेड
आयफोन 17 मध्ये Apple Bionic A19 चिप असण्याची शक्यता आहे. जी आयफोन 16 मधील A18 पेक्षा अधिक पॉवरफुल असेल. हा नवीन प्रोसेसर मल्टीटास्किंग आणि गेमिंग अनुभव अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवेल. यासोबतच iPhone 17 मध्ये 12GB रॅम (पूर्वीच्या 8GB च्या तुलनेत) असू शकते. ज्यामुळे हेवी टास्क म्हणजेच फोनवरील अवघड कामे सहज पार पाडता येतील. तसेच Apple ऑक्टा-कोर प्रोसेसरचा समावेश करू शकते, जो मागील हेक्सा-कोर सेटअपच्या तुलनेत अधिक चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो.
कॅमेरा तंत्रज्ञानातील मोठी झेप
फोटोग्राफीसाठी आयफोन 17 मध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. यामध्ये 50MP चा मुख्य सेन्सर असेल जो आयफोन 16 मधील 48MP च्या तुलनेत थोडा अधिक प्रगत असेल. विशेषतः कमी प्रकाशात फोटो काढण्यासाठी iPhone 17 मध्ये f/1.5 अपर्चरचा समावेश असण्याची शक्यता आहे. अल्ट्रा-वाइड लेन्स 12MP चाच राहील.परंतु सुधारित इमेज प्रोसेसिंगमुळे छायाचित्रांची गुणवत्ता अधिक चांगली असेल. सेल्फी कॅमेऱ्याबाबत मोठे अपडेट असून आयफोन 17 मध्ये 24MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो, जो आयफोन 16 च्या 12MP कॅमेऱ्याच्या तुलनेत दुप्पट अधिक पिक्सेल प्रदान करतो.
बॅटरी आणि चार्जिंग क्षमता
आयफोन 17 मध्ये बॅटरी बॅकअप सुधारण्यासाठी मोठे अपडेट्स मिळू शकतात. सध्याच्या माहितीनुसार, iPhone 16 च्या 3561mAh बॅटरीच्या तुलनेत iPhone 17 मध्ये 4190mAh ची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे. यामुळे डिव्हाइसचा स्क्रीन ऑन-टाइम आणि एकूण बॅटरी परफॉर्मन्स सुधारेल. शिवाय 46W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.जो आयफोन 16 मधील 25W च्या तुलनेत अधिक वेगवान असेल.
इतर प्रमुख वैशिष्ट्ये आणि कनेक्टिव्हिटी
आयफोन 17 आणि आयफोन 16 दोन्ही डिव्हाइसेस 5G कनेक्टिव्हिटी, सॅटेलाइट इमर्जन्सी SOS आणि क्रॅश डिटेक्शन फिचर देतात. मात्र नवीनतम मॉडेलमध्ये Wi-Fi 8 चा सपोर्ट दिला जाऊ शकतो. जो इंटरनेट स्पीड आणि स्थिरता आणखी सुधारेल.
किंमत आणि उपलब्धता
आयफोन 16 सध्या 72900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. आयफोन 17 2025 च्या सप्टेंबर महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.मात्र त्याच्या किंमतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
अपग्रेड करणे फायदेशीर ठरेल का?
जर तुम्ही आधीच आयफोन 16 वापरत असाल आणि त्याच्या परफॉर्मन्सवर समाधानी असाल तर तातडीने अपग्रेड करण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्हाला नवीनतम प्रोसेसर, अधिक चांगला कॅमेरा आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हवी असेल तर iPhone 17 कडे अपग्रेड करणे योग्य ठरू शकते. भविष्यात आणखी मोठ्या सुधारणांसाठी तुम्ही पुढील काही वर्षे वाट पाहण्याचा विचारही करू शकता