७ फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा सरासरी ताशी वेग सध्या २५ किलोमीटर आहे.आता यामध्ये वाढ होऊन मेट्रो ६० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे.नुकतीच बेलापूर – ते पेंधर या मार्गावर चाचणी झाली असून अर्ध्या तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
सिडको महामंडळाने बांधलेल्या नवी मुंबई मेट्रोचे संचलन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोकडून सुरू आहे.आतापर्यंत या मेट्रोसेवेचा ६० लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. सिडकोला तिकीट दरातून १४ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बेलापूर ते – पेंधर या ११.१ किलोमीटरच्या अंतरावर मेट्रोची ११ विविध स्थानके आहेत.२० जानेवारीपासून सिडकोने मेट्रो मार्गावर सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-13.jpg)
गर्दीच्या काळात बेलापूर येथून सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत दर दहा मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या सुटतात.तर पेंधर येथून सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७.३० दरम्यान दर १० मिनिटांनी मेट्रो धावत आहे.
सिडकोकडून प्राप्त माहितीनुसार, जानेवारी महिन्यात नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या मार्गिकेच्या गतीची चाचणी घेतली आहे.मात्र,अद्याप ही चाचणी यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र सिडकोला मिळाले नाही.पुढील दीड महिन्यात वेगाचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असून मेट्रोची गती वाढवण्यात येणार आहे.
विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे नवी मुंबई मेट्रोला नुकतेच आयएसओ ९००१-२०१५ हे मानांकन मिळाले आहे. गुणवत्ता व्यवस्थापन, व्यावसायिक स्वास्थ्य तथा सुरक्षा व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली ही तीनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी राज्यातील एकमेव मेट्रो सेवा आहे.