Apple चा फोल्डेबल आयफोन गेमचेंजर ठरणार? फ्लिप डिझाइनवरही सुरू झाली हालचाल

Published on -

Foldable iPhone : स्मार्टफोनच्या जगात कायम नव्या प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अॅप्पलकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अॅप्पल बुक-स्टाईल फोल्डेबल आयफोनवर काम करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मात्र आता क्लॅमशेल म्हणजेच फ्लिप-स्टाईल फोल्डेबल आयफोनच्या दिशेनेही अॅप्पल विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन थेट सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप आणि मोटोरोला रेझर यांना कडवी टक्कर देऊ शकतो.

ब्लूमबर्गचे प्रसिद्ध तंत्रज्ञान विश्लेषक मार्क गुरमन यांच्या अहवालानुसार, अॅप्पल सध्या “चौकोनी, क्लॅमशेल-शैलीतील फोल्डेबल आयफोन” या संकल्पनेवर प्राथमिक पातळीवर काम करत आहे.

हा प्रोजेक्ट अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून तो प्रत्यक्षात बाजारात येईलच, असे ठामपणे सांगता येत नाही. सध्या ही संकल्पना अॅप्पलच्या लॅब्समध्ये चर्चा आणि चाचणीच्या पातळीवर आहे.

दरम्यान, अॅप्पलचा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल आयफोन 2026 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पहिल्या फोल्डेबल फोनला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास, पुढील टप्प्यात फ्लिप-स्टाईल फोल्डेबल आयफोन सादर करण्याचा अॅप्पलचा विचार असू शकतो. त्यामुळे कंपनी हळूहळू फोल्डेबल सेगमेंटमध्ये पाय रोवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

लीक्सनुसार, पहिल्या बुक-स्टाईल फोल्डेबल आयफोनमध्ये 5.5 इंचाचा आउटर डिस्प्ले आणि सुमारे 7.8 इंचाचा इनर डिस्प्ले मिळू शकतो. परफॉर्मन्ससाठी 12GB LPDDR5 रॅम आणि अॅप्पलचा स्वतःचा C2 मोडेम देण्यात येण्याची शक्यता आहे. बॅटरीसाठी 5,400 mAh क्षमतेची दमदार बॅटरी असू शकते.

फोटोग्राफीच्या बाबतीतही अॅप्पल मोठा बदल करू शकतो. या फोल्डेबल आयफोनमध्ये मागील बाजूस 48MP चे दोन कॅमेरे, तर इनर आणि आउटर दोन्ही स्क्रीनसाठी 18MP फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

जर अॅप्पलने फ्लिप डिझाइनचा फोल्डेबल आयफोन प्रत्यक्षात आणला, तर फोल्डेबल स्मार्टफोन बाजारातील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. अॅप्पलचा प्रवेश या सेगमेंटची दिशा बदलू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe