स्मार्टफोन बाजारात भारताचा दबदबा ; विक्रमी निर्यातीचा अंदाज

Sushant Kulkarni
Published:

१६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशातील स्मार्टफोन बाजाराचे मार्केट मूल्य यावर्षी ५० अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची अपेक्षा असून विद्यमान आर्थिक वर्षात निर्यात २० अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते. ‘मेड इन इंडिया’ अॅपल आयफोनच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे एकूण स्मार्टफोन निर्यातीत झेप घेणार असल्याचा अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.गेल्या आर्थिक वर्षात १५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त स्मार्टफोन निर्यात झाली होती. यामध्ये अॅपलचा वाटा सुमारे १० अब्ज डॉलर इतका होता. त्यामुळे या आर्थिक वर्षात हा आकडा २० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे.

प्रीमियमायझेशनचा वाढता कल आणि स्थानिक उत्पादनावर भर दिल्याने,भारतातून निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये अॅपल आणि सॅमसंग आघाडीवर आहेत. मूळ उपकरणे निर्माते ब्रँड इक्विटी मजबूत करण्यासाठी तसेच नफा सुधारण्यासाठी प्रीमियम स्मार्टफोनवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.त्यामुळे स्मार्टफोन बाजार देखील वेगाने विकसित होत आहे.

रोजगाराच्या थेट संधींमध्ये सुमारे १० लाख अभियंते, २० लाख आयटीआय प्रमाणित व्यावसायिक आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स सारख्या क्षेत्रांमध्ये २ लाख पदांचा समावेश आहे.तांत्रिक क्षेत्रांमध्ये लाखो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित असल्याचा अंदाज टीमलीज डिग्री अप्रेंटिसशिपच्या अलीकडील अहवालात म्हटले आहे.

देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने आणलेल्या पीएलआय योजनेच्या फायद्यांमुळे गेल्या वर्षात अॅपलच्या निर्यातीने विक्रम केला आहे.गेल्या चार वर्षांमध्ये अॅपल इकोसिस्टमने १ लाख ७५ हजार नवीन थेट नोकऱ्याही निर्माण केल्या आहेत.यामध्ये ७२ टक्क्यांपेक्षा जास्त पदांवर महिलांची भरती झाली आहे. २०२७ पर्यंत देशात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १.२ कोटी नोकऱ्या निर्माण होतील,असा अंदाज आहे. यापैकी ३० लाख प्रत्यक्ष आणि ९० लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या असतील.

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर्सचे उत्पादन साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, उद्योगाला त्याची उत्पादन क्षमता पुढील पाच वर्षांत पाचपट वाढवावी लागेल.सध्या देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन १०१ अब्ज डॉलर असून यामध्ये मोबाईल फोनचे योगदान १२ टक्के आहे,तर इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांचे योगदान ११ टक्के आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe