iPhone 18 Smartphone : ॲपलचा पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max अजून लाँच होण्यासाठी काही महिने शिल्लक असले तरी, आत्तापासूनच या फोनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कारण यावेळी केवळ प्रो मॉडेल्सच नाही, तर ॲपल आपला पहिला फ्लिप किंवा फोल्डेबल आयफोन बाजारात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सप्टेंबर 2026 मध्ये हे फोन जागतिक स्तरावर सादर केले जाऊ शकतात.

पूर्वीच्या लाँच ट्रेंडनुसार, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ॲपलचा भव्य इव्हेंट होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतर लगेचच प्री-ऑर्डर सुरू होतील आणि काही दिवसांतच विक्रीला सुरुवात होईल.
जागतिक लाँचनंतर भारतातही हे फोन लवकरच उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन सादर केला जाऊ शकतो, तर नियमित iPhone 18 चे लाँचिंग 2027 पर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, iPhone 18 Pro ची भारतातील संभाव्य किंमत सुमारे 1,35,000 रुपये असू शकते, तर iPhone 18 Pro Max साठी 1,54,900 रुपये मोजावे लागू शकतात. मात्र, ही किंमत अंतिम फिचर्स, मेमरी पर्याय आणि चलन दरांवर अवलंबून असेल.
iPhone 18 सीरिजमध्ये सर्वात मोठे बदल कॅमेरा विभागात पाहायला मिळू शकतात. 48 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप, व्हेरिएबल अपर्चर, तसेच अधिक प्रगत ऑप्टिकल झूम यासारखी वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, नवीन A20 Pro चिपमुळे फोनची गती, ऊर्जा कार्यक्षमता आणि ऑन-डिव्हाइस एआय कामगिरी अधिक सुधारेल.
बॅटरीच्या बाबतीतही मोठी सुधारणा अपेक्षित आहे. iPhone 18 Pro Max मध्ये सुमारे 5,100mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते, जी आतापर्यंतची सर्वात मोठी आयफोन बॅटरी ठरू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी सुधारित C2 मॉडेमसह काही बाजारात mmWave 5G सपोर्ट पुन्हा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सध्या ही सर्व माहिती प्राथमिक लीक आणि अहवालांवर आधारित असून, ॲपलकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच iPhone 18 Pro सीरिजचे अंतिम तपशील स्पष्ट होतील.













