iPhone : स्मार्टफोन म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो कॅमेरा. फोनमधला कॅमेरा म्हणजे फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठीच असतो, असं बहुतेकांना वाटतं. पण आयफोनचा कॅमेरा यापेक्षा कितीतरी जास्त कामं करतो, हे तुम्हाला माहीत आहे का? ॲपल दरवर्षी आयफोनमध्ये कॅमेरा फीचर्स अपडेट करत असतं आणि त्यामुळे आज आयफोनचा कॅमेरा एक प्रकारे ‘मल्टी-टूल’ बनला आहे.
आयफोनमध्ये आधीपासूनच दिलेलं Measure App हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वस्तूची लांबी, रुंदी किंवा उंची सहज मोजू शकता. भिंत, टेबल, दरवाजा, सोफा अशा गोष्टी मोजण्यासाठी आता टेप घेऊन फिरायची गरज नाही.

Measure App उघडून कॅमेरा त्या वस्तूकडे धरा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या प्लस (+) चिन्हावर टॅप करा. काही सेकंदांतच अचूक माप स्क्रीनवर दिसतं.
इतकंच नाही, तर आयफोनचा कॅमेरा Live Text फीचरमुळे मजकूर ओळखण्यातही पटाईत आहे. रस्त्यावरील बोर्ड, जाहिरात, पुस्तकाचं पान किंवा एखाद्या डॉक्युमेंटमधील मजकूर पुन्हा टाइप करण्याची गरज उरत नाही.
कॅमेरा मजकुराकडे धरताच स्क्रीनवर टेक्स्ट आयकॉन दिसतो. त्यावर टॅप केल्यावर तो मजकूर कॉपी करता येतो. फोन नंबर सेव्ह करणे, ईमेल आयडी जतन करणे किंवा नोट्स घेणे खूप सोपं होतं.
आयफोनचा कॅमेरा स्कॅनर म्हणूनही काम करतो. महत्त्वाचे कागदपत्र, बिलं किंवा सर्टिफिकेट PDF फाइलमध्ये रूपांतरित करता येतात. Files App उघडून तीन डॉट्स मेन्यूमधील Scan Document हा पर्याय निवडला की कॅमेऱ्याने डॉक्युमेंट स्कॅन करता येतं. स्कॅन झाल्यावर ते थेट PDF म्हणून सेव्ह होतं, जे ऑफिस आणि सरकारी कामांसाठी फार उपयोगी ठरतं.
विशेष म्हणजे, वहीत किंवा नोटबुकमध्ये हाताने लिहिलेल्या मजकुरालाही आयफोन कॅमेऱ्याच्या मदतीने डिजिटल टेक्स्टमध्ये बदलता येतं. हा मजकूर नंतर मेसेज, ईमेल किंवा Notes App मध्ये सेव्ह करता येतो.
शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन वापरासाठी आयफोनचा कॅमेरा त्यामुळे केवळ फोटोपुरताच मर्यादित न राहता एक स्मार्ट सहाय्यक बनला आहे.













