Mobile Farud : आजच्या या मोबाईल अन तंत्रज्ञानाच्या युगात असा एखादाच व्यक्ती असेल जो मोबाईल सोबत जोडला गेलेला नाही. सध्या मोबाईलचा वापर सामान्य झाला आहे. आपण सर्वजण महागडे स्मार्टफोन वापरतो. कारण की आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतांशी कामे मोबाईलशी कनेक्ट झालेली आहेत.
मोबाईल विना अनेक कामे अडकून राहण्याची शक्यता आहे. मोबाईल सोबत आता सोशल मीडियाचा वापर पण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे आजच्या या युगाला डिजिटल युग असं संबोधले जातय. पण या डिजिटल युगात काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे.

कारण सोशल मीडियामुळे तसेच मोबाईल मुळे जेवढे मानवाचे आयुष्य सोपे झाले आहे तेवढेच अवघड पण बनवू शकते. संवाद, व्यवहार आणि खरेदी सर्व काही मोबाईलवरून होतय, यामुळे आधीच्या तुलनेत आयुष्य अधिक सोपं झालं आहे.
पण अलीकडे सायबर गुन्हेगारांचे पण प्रमाण वाढले आहे. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी आता सायबर भामटे नवनवीन मार्ग शोधत आहेत. अशातच आता एक महत्त्वाची आणि मोबाईल वापरकर्त्यांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे.
खरे तर सध्या व्हाट्सअपवर एक नवीन स्कॅम सुरू झाला आहे. सध्या व्हॉट्सॲपवर मिशो गिफ्ट स्कॅमचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. या स्कॅममध्ये “मिशो गिफ्ट” या नावाने एक लिंक मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
त्या लिंकसोबत असे सांगितले जाते की, ही लिंक 20 जणांना शेअर करा आणि तुम्हाला फ्री गिफ्ट मिळेल. अनेकजण लोभाला बळी पडून ती लिंक शेअर करतात किंवा त्यावर क्लिक करतात. परंतु प्रत्यक्षात कोणतेही गिफ्ट मिळत नाही; उलट वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा आणि मोबाईल माहिती हॅक केली जाते.
सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लिंकवर क्लिक केल्यावर वापरकर्त्यांना मिशो कंपनीतून बोलत असल्याचे भासवले जाते आणि ओटीपी मागवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे वर्ग केले जातात. अशा प्रकारे अनेकांचा आर्थिक नुकसानीसह वैयक्तिक माहितीही धोक्यात येते.
याच पद्धतीने “इंडिया पोस्ट अनुदान योजना”, “एसबीआय लाभ योजना” किंवा “सरकारी मदत” अशा नावानेही बनावट लिंक व्हॉट्सॲपवर शेअर होत आहेत. या सर्व लिंक फसवणुकीचा भाग असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणतीही संशयास्पद लिंक किंवा मेसेज मिळाल्यास त्यावर क्लिक करू नये. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवरून कोणतीही माहिती देऊ नये. तसेच आर्थिक व्यवहारासंदर्भात ओटीपी, पिन किंवा बँक तपशील कोणालाही सांगू नयेत.
डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी सतर्कता हीच सर्वोत्तम बचावाची शस्त्र आहे. प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याने स्वतःची सायबर सुरक्षितता वाढवावी आणि कोणत्याही आकर्षक ऑफरच्या नावाखाली होणाऱ्या डिजिटल चोरीपासून सावध राहावे.