Mobile On EMI : तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे अनेकजण EMI वर स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शून्य व्याजदरात ग्राहकांना मोबाईल खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने EMI वर मोबाईल खरेदी करणे ग्राहकांना परवडणारे ठरते.
दरम्यान जर तुम्हीही ईएमआय वर मोबाईल घेत असाल तर तुमच्यासाठी आरबीआयकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार आरबीआय ईएमआयवर मोबाईल घेणाऱ्यांसाठी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

खरेतर येत्या काळात EMI थकल्यावर मोबाईल लॉक केला जाणार आहे. याबाबत आरबीआय कडून लवकरच निर्णय होणार असा अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरु असून आज याच चर्चांवर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठी माहिती दिली आहे.
जर ग्राहकाने मोबाईल फोन ईएमआयवर घेतला असेल आणि तो हप्ते भरण्यात अपयशी ठरला, तर बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना (NBFCs) त्या मोबाईलला रिमोटने लॉक करण्याचा अधिकार मिळू शकतो, असे गव्हर्नर यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे. बँकांच्या अडचणी आणि ग्राहकांचे हक्क या दोन्ही गोष्टींचा विचार केला जात आहे. ग्राहकांचे हित हे आमच्यासाठी सर्वोपरि राहील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, RBI आपल्या फेअर प्रॅक्टिसेस कोड मध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या बदलामुळे बँका किंवा NBFCs ना ईएमआय न भरल्यास मोबाईल फोन लॉक करण्याची परवानगी मिळेल. मात्र, हा नियम लागू करण्यापूर्वी ग्राहकाने लोन करार करताना आपली स्पष्ट संमती दिली असणे आवश्यक आहे.
तसेच, फोनमधील डेटा बँकांना पाहण्याचा किंवा छेडछाड करण्याचा अधिकार मिळणार नाही. लेंडर्सचे म्हणणे आहे की, हा उपाय मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या छोट्या कर्जांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
गेल्या काही वर्षांत हाय-एंड स्मार्टफोन्ससाठी घेतलेल्या लहान कर्जांमध्ये डिफॉल्ट वाढले आहेत. जसे गाडी किंवा घर ईएमआय न भरल्यास जप्त करता येते, तसेच मोबाईलवरही दबाव आणता येईल, असा त्यांचा तर्क आहे.