सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. उठता-बसता, खाता-पिता, अगदी टॉयलेटमध्येही अनेक लोक फोनचा वापर करताना दिसतात. आपण आपल्या स्मार्टफोनपासून किती वेळ दूर राहू शकतो? तुम्ही तुमचा फोन शेवटचा कधी पाहिला होता? या सवयीमुळे आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? याच संदर्भात एका संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
जर्मनीच्या Heidelberg University आणि University of Cologne च्या संशोधकांनी 18 ते 30 वयोगटातील 25 यंग अडल्ट्सवर एक प्रयोग केला, ज्यामध्ये त्यांना 72 तासांसाठी स्मार्टफोन वापरण्याचे बंधन घालण्यात आले. फक्त अत्यावश्यक कम्युनिकेशन आणि वर्क टास्क्ससाठी फोन वापरण्याची परवानगी होती. या संशोधनातून स्मार्टफोनचा मेंदूच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रभाव पडतो हे स्पष्ट झाले आहे.

मेंदूच्या कार्यप्रणालीत झाले मोठे बदल
स्मार्टफोन ‘डायट’ म्हणजेच कमी वापर करण्याच्या प्रयोगाआधी आणि नंतर, MRI स्कॅन आणि मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या. यात स्पष्ट दिसून आले की फोन वापरण्यावर निर्बंध आणल्याने मेंदूच्या कार्यप्रणालीत लक्षणीय बदल होतात. विशेषत: व्यसनाशी संबंधित न्यूरोट्रांसमीटर सिस्टमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे फोन वापरण्याची सवय किंवा त्यावर अवलंबित्व अधिक ठळकपणे दिसून येते.
संशोधनाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, दीर्घकाळ फोन वापरण्याने मेंदूतील न्यूरल पॅटर्न्स बदलतात आणि डिजिटल डिव्हाइसेसवरील अवलंबित्व वाढते. त्यामुळे मेंदूच्या प्रतिक्रियांवर याचा मोठा प्रभाव पडतो.
स्मार्टफोन बंद ठेवल्यास मेंदूची कार्यप्रणाली बदलते
MRI स्कॅन दरम्यान, संशोधनातील सहभागींना विविध प्रकारच्या प्रतिमा दाखवण्यात आल्या. यात स्मार्टफोन चालू आणि बंद असताना घेतलेल्या प्रतिमा, तसेच न्यूट्रल इमेजेस (जसे की बोट्स आणि फुले) दाखवण्यात आल्या. प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार, अल्पकालीन स्मार्टफोन वापर बंद केल्यानेही मेंदूच्या न्यूरल पॅटर्न्समध्ये बदल दिसून आला. हे स्पष्ट करते की डिजिटल उपकरणे आपल्या मेंदूवर मोठा प्रभाव टाकतात.
संशोधकांनी नमूद केले की, स्मार्टफोन वापरण्याची तीव्र इच्छा आणि सोशल इंटरॅक्शनची गरज यामध्ये स्पष्ट संबंध आढळले आहेत. याचा अर्थ आपला मेंदू स्मार्टफोनशिवाय सामाजिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासाठी स्मार्टफोन वापरण्याची सवयच मोठी अडचण बनते.
संशोधकांनी असेही नमूद केले की, सध्याच्या अभ्यासाने हे स्पष्ट केले असले तरी भविष्यात आणखी खोलवर संशोधन करून याचे निश्चित निष्कर्ष काढण्याची गरज आहे. भविष्यातील अभ्यासात स्मार्टफोन व्यसन आणि सोशल इंटरॅक्शन यांच्यातील संबंध अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे.
स्मार्टफोनपासून थोडा ब्रेक घेणे गरजेचे
या संशोधनातून एक स्पष्ट निष्कर्ष काढता येतो की स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे आपल्या मेंदूवर मोठा प्रभाव पडतो. फक्त 72 तास फोन न वापरल्यास मेंदूच्या न्यूरल पॅटर्न्समध्ये बदल दिसून येतात, त्यामुळे दीर्घकालीन वापराने काय परिणाम होऊ शकतो,हा अधिक गंभीर विषय आहे. जर तुम्हीही स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवत असाल, तर स्वतःसाठी एक ‘डिजिटल डिटॉक्स’ प्लॅन तयार करा आणि कधीतरी फोनपासून ब्रेक घ्या. यामुळे तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते आणि डिजिटल डिव्हाइसेसवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते