सोमवारी दुपारी दोनच्या मुंबईत हवामानात अचानक बदल झाला. धुळीच्या वादळानंतर गारपिटीसह पाऊस सुरू झाला. सोमवारी मुंबईला ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला.
सोसाट्याचा वारा व वादळामुळे दिवसा रात्रीसारखा काळोख दिसून येत होता. त्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला. घाटकोपर येथे १०० फूट उंच होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले.
त्याखाली अनेक वाहने दबली गेली असून, आठ जण ठार, तर ५९ जण जखमी झाले. वडाळा येथेही लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळला. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
दबलेल्या ४७ जणांना बाहेर काढण्यात आले. अनेकांना गंभीर दुखापत झाली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका ४० फूट होर्डिंग्ज उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग १०० फुटांचे होते.
मुंबईतील घाटकोपर, वांद्रे, कुर्ला, धारावी परिसरात ताशी ६० किमी वेगाने वारे वाहत होते. मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. अचानक वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाले. दुसरीकडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला होता.
२४ तासांत मुसळधारेची शक्यता
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
१५ विमाने इतर ठिकाणी वाळवावी लागली
धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता घातली होती. परिणामी १५ विमाने इतर ठिकाणी वळवावी लागली असल्याचे समजते. तब्बल ६६ मिनिटे विमानतळावरील उड्डाणे बंद राहिल्यानंतर ५:०३ वाजता उड्डाणे पूर्वरत झाली होती.