अहिल्यानगर: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्यापावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री झालेल्या पावसानंतर गुरुवारी सायंकाळीही नगर शहर, कर्जत, पारनेर, अकोले, राहुरी, नेवासा, पाथर्डी, जामखेड आणि शेवगाव तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात आणि काही भागांत गारपिटीसह पाऊस पडला.
या अवकाळी पावसामुळे कांदा, ऊस, आंबा यांसारख्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. नगर शहरातही दुपारी चारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
संगमनेर शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये गुरुवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. याआधी बुधवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू राहिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी आभाळ अचानक दाटून आले आणि वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली.
राज्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर असून, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी तसेच विदर्भातील भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस झाला.
वादळी पावसादरम्यान भंडारा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून चार जणांचा, त्यात शेतकरी महिलांचाही समावेश आहे, दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय वीज कोसळल्याने बैल आणि शेळ्याही दगावल्या आहेत.