Maharashtra Weather :- 2023 मधील खरीप हंगामाचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये हवा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम फार मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्याचे चित्र संपूर्ण भारतामध्ये दिसून आले.
अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे व त्याचा परिणाम आता रब्बी हंगामावर देखील दिसून येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण जानेवारी ते मार्च या कालावधीचा विचार केला तर या तीन महिन्यात देशाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला बसण्याचा अंदाज आहे.
नेमके याबाबतीत हवामान खात्याने काय माहिती दिली आहे? याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
जानेवारी ते मार्च दरम्यान देशात अवकाळी पावसाची शक्यता
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात संपूर्ण देशात सरासरी 69.7 मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या 112 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याचा अंदाज असून हिवाळ्यात या डिसेंबर अखेर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले असून पुढील काळात देखील ते जास्त राहण्याचा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात देखील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात देशाच्या बऱ्याच भागामध्ये सरासरीच्या 112 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून महाराष्ट्राला देखील या अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
एल निनोची स्थिती कधीपर्यंत राहील सक्रिय?
प्रशांत महासागरातील जी काही एल निनोची स्थिती आहे ती या मार्च अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे एकूण तापमानामध्ये वाढ होण्याचा कल कायम राहणार आहे. जर आपण 2023 मध्ये देशाचे तापमान पाहिले तर ते सरासरीपेक्षा 0.65 अंशांनी जास्त राहिले.
या अगोदर अशी स्थिती 2016 मध्ये उद्भवली होती व तेव्हा सरासरी तापमान 0.71 अंश यांनी जास्त नोंदवली गेली होते.