Summer Health Tips | उन्हाळ्याचा ऋतू म्हणजे सततचा घाम, थकवा, उष्णतेची झळ आणि त्यामुळे होणारी चिडचिड. मात्र जर योग्य काळजी घेतली, तर याच ऋतूत तुम्ही उर्जावान आणि ताजेतवाने राहू शकता. यासाठी गरज आहे ती बाजारातील कृत्रिम उत्पादने न वापरता आपल्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक व पारंपरिक घरगुती उपायांवर भर देण्याची.
उन्हाळ्यात शरीर सतत उष्णतेशी झुंज देत असते. हे शरीर एक नैसर्गिक एअर कंडिशनरसारखे काम करतं – घामाच्या स्वरूपात उष्णता बाहेर टाकतं. पण यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. जर पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर सुस्ती, थकवा आणि चक्कर यासारखे त्रास सुरू होतात. त्यामुळे ‘हायड्रेशन’ हा उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्याचा मुख्य मंत्र आहे.

‘हे’ उपाय करा-
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काही पारंपरिक उपाय खूप प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ, गुलकंद सरबत हे शरीराची उष्णता कमी करतं आणि मनाला ताजेपणा देतं. तसेच कच्च्या आंब्यापासून बनवलेलं पन्हं उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण करतं, पचन सुधारतं आणि थकवा दूर करतं.
याचबरोबर टरबूजाचा रस देखील एक अप्रतिम हायड्रेटिंग ड्रिंक आहे जो त्वचेला चमक देतो. दुधीचा रस हे आणखी एक अद्भुत पेय आहे जे शरीराला थंड ठेवण्याबरोबरच वजन नियंत्रणात ठेवतं.
तसेच सफरचंदाचं शरबत पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर करतं आणि उन्हाळ्यातील थकवा दूर करतं. तसेच चंदनाची पेस्ट शरीरावर लावल्यास त्वचा थंड राहते आणि घामाचा वास कमी होतो.
माठामधील पाणी-
अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मातीच्या भांड्यातलं पाणी. रेफ्रिजरेटरऐवजी मातीच्या मडकीत ठेवलेलं पाणी थंडसुद्धा राहतं आणि नैसर्गिकपणे आरोग्यदायी देखील असतं. त्यात तुळशीची पानं किंवा गुलाबाच्या पाकळ्या घातल्यास ते अधिक सुगंधी आणि ताजेपणा देणारं बनतं.
उन्हाळा हा त्रासदायक असला तरी या सोप्या उपायांनी तो आनंददायी बनवता येतो. फक्त थोडी खबरदारी, शहाणपण आणि नैसर्गिक जीवनशैली अवलंबली, की उन्हाळा देखील अगदी आनंदी जातो.