Maharashtra Havaman : कोकण व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. तर तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या वातावरणात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. राज्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामान होत असून उकाडा जाणवत आहे. कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे.
मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे आहे. सर्वसाधारण स्थिती उत्तरेकडे राहण्याची शक्यता आहे. ईशान्य बांगलादेश परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सध्या राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे. येत्या २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.