Maharashtra News : राज्यासह जिल्ह्यातील वातावरणातील तापमानात चांगलीच वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे घामाघुम झालेले नागरिक, मजुर, शेतमजूर दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेऊन विश्रांती घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
उष्णतेमुळे चिमुकली बालके, सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरीक हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत.
लग्न समारंभाची धामधूम सुरु असतानाच सूर्य आग ओकू लागला असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे. भर दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान रस्त्या वरील वाहतूक मंदावत आहे.
व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असून रस्ते निर्मनुष्य होत आहेत. या काळात नागरिक घरात राहणे पसंत करत आहेत. उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मोटार सायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत.
उन्हाचा पारा चढल्याने वीजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुपारच्या वेळी ग्रामीण भागातील वीज गुल होत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरीक उन्हाचा चटका सहन केल्यानंतर रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत.
सकाळपासूनच अंगातून लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.