११ फेब्रुवारी २०२५ सुपा : सध्या वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले असून, रात्री अन् पहाटे गारठा जाणवत आहे. तर दिवसभर उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. सध्या दिवसा तापमानाचा पारा ३० अशांच्या पुढे गेल्याने फेब्रुवारीतच येणारा उन्हाळा कडक असेल याचे संकेत मिळू लागले आहेत. रात्रीच्या वेळी तापमान खाली येत असल्याने या वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येत आहे.
मागील आठवड्यापासून दिवसा उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत.वातावरणातील या बदलाने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.शहरासह ग्रामीण भागात सध्या गेल्या काही दिवसांपासून सायंकाळ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात गारवा जाणवतो,त्यानंतर दुपारी व सायंकाळी पाच वाजेपर्यंत उकाडा जाणवत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-69.jpg)
वातावरणातील हा बदल काही लोकांसाठी आनंददायी असला तरी अचानकपणे वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेकांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून तापमानात एकाएकी लक्षणीय चढउतार होत आहेत. तापमान हळूहळू वाढत असून, दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सीअस पर्यंत पोहचले आहे.
त्याचवेळी रात्रीचे तापमान २० अंश सेल्सीअसपर्यंत खाली येत आहे. यामुळे दिवसा व रात्री या दोन्ही वेळी जाणवणाऱ्या तापमानात तफावत जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. वातावरणातील या विषय हवामानामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवायला लागल्या आहेत.
सोबतच उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने नागरिक उन्हापासून सुरक्षा मिळविण्यासाठीचे उपाय करत आहेत. दिवसा चांगलाच उकाडा जाणवत असून, कुलर लावण्याची वेळ आली नसली तरी, पंखे मात्र सुरू ठेवावे लागत आहेत. सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्यांना मात्र थंडीपासून बचावासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत.