अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा तडाखा असे विषम हवामान अनुभवास येत आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर दुसरीकडे पाथर्डी तालुक्यातील काही ठिकाणी उभी पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी, घुमटवाडी, चेकेवाडी, लांडकवाडी, चितळवाडी आणि माणिकदौंडी परीसरातील शेतकऱ्यांच्या दुसाट्याचे गहु , कांदा व काही फळफिके आणि चारापिके पाण्याअभावी जळुन गेली आहेत.
यावर्षी पाणी पातळी अतिशय खोल गेल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे पीकविमा कंपन्यांनी व सरकारने पीकनुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सत्रे, राजेंद्र झांबरे, आंबादास फुंदे, बबन आडागळे, विजय चव्हाण,अतुल चव्हाण, कोशव परदेशी, प्रल्हाद सत्रे, मच्छद्रिं सत्रे, वैभव सत्रे, रोहीदास सत्रे, सतिष कर्डीले या शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ.उद्धव नाईक यांच्याकडे केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी व आल्हणवाडी हा परीसर डोंगराळ भागाचा आहे. यावर्षी सुरवातीला पाऊस चांगला झाला. मात्र परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदा जेमतेमच पाणीसाठी झाला होता. परिणामी सुरूवातीचा काही काळ व्यवस्थीत गेला मात्र त्यानंतर जमिनीतील पाण्याचा बेसुमार उपसा झाला. त्यातच परत परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठला. कांदा हे नगदी पिक आहे. गहु, हरबरा व कांदा ही पिके शेतकरी घेतात. कांद्याला बियाणे, लागवड, खते व खुरपणी असा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला.
परंतु ऐन अखेरच्या टप्यात पाणी आटल्याने या भागात दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे. कांद्याला लाखो रुपयाचा खर्च करुन शेतकरी आता कांदा जळाल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने व विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी, शेती पिकांचेपंचनामे करावेत अशी मागणी तहसीलदार नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.