Havaman Andaj : मागील वर्षी अर्थात २०२३ मध्ये एल निनोचा प्रभाव वातावरणात जाणवला. यामुळे वर्षभर वातावरण विषम राहिले. एल निनोने २०२३ हे वर्ष २०१६ नंतर इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने सन १९०१ नंतरचे सर्वात उष्ण महिने म्हणून नोंदवले गेले आहेत. जून ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी तापमानही इतिहासातील सर्वोच्च असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
२०२४ मध्ये अशी असेल स्थिती
अल निनोची सकारात्मक स्थिती फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम राहील असा अंदाज व्यक्त केला असून जानेवारी २०२४ मध्ये जास्त हिवाळा नसेल तसेच थंडीची लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचे सांगितले आहे.
एल निनोमुळे जोरदार उष्ण वारे वाहत असून ही स्थिती फेब्रुवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केला असून २०२४ च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यंदा चांगला पाऊस अपेक्षित
एल निनोची परिस्थिती एप्रिलपासून कमकुवत होण्याची शक्यता असून त्यामुळे मान्सून चांगला बरसेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला. पावसाळ्याचे चार महिने चांगला पाऊस पडेल अशी शक्यता आहे. २०२३ मध्ये उष्णता जास्त होती व पाऊसही नेहमीपेक्षा कमी पडला.