उन्हाळ्याच्या कडक ऊनात थंडगार पेयाची तलफ येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी जर तुमच्या हातात ताज्या उसाच्या रसाचा ग्लास असेल, तर मनाला आणि शरीराला एक वेगळीच ताजगी मिळते.
उसाचा रस केवळ चवीला अप्रतिमच नाही, तर तो थकवा घालवून तुम्हाला ऊर्जा आणि उत्साहाने भरतो. बाजारात किंवा गाड्यांवर मिळणारा हा रस प्रत्येक वेळी घेणे शक्य नसते. पण काळजी करू नका. मोठ्या मशिनशिवायही तुम्ही घरात अगदी गाड्यांवर मिळतो तसाच थंडगार आणि स्वादिष्ट उसाचा रस बनवू शकता. चला, जाणून घेऊया ही सोपी आणि झटपट रेसिपी, जी तुम्हाला रिफ्रेश करेल.

साहित्य
ऊस: 2 कप (लहान किंवा मध्यम तुकडे) बर्फाचे तुकडे: 3 ते 4 , साखर: चवीनुसार (ऐच्छिक) आलं: 1 लहान तुकडा, पुदिन्याची पाने: 4 ते 5, काळे मीठ: चिमूटभर, पाणी: गरजेनुसार
कसा करायचा रस
प्रथम उस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्याची साल काढून टाका. नंतर उसाचे लहान किंवा मध्यम आकाराचे तुकडे करा, जेणेकरून ते मिक्सरमध्ये सहज बारीक होतील.
आता मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये उसाचे तुकडे, बर्फाचे तुकडे, चवीनुसार साखर (जर हवी असेल तर), आल्याचा लहान तुकडा आणि पुदिन्याची पाने घाला.
या सर्व साहित्याला थोडे पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करा. मिक्सर फिरवताना साहित्य एकजीव होईपर्यंत रस काढा. तयार झालेला रस गाळून एका ग्लासमध्ये काढा आणि त्यावर चिमूटभर काळे मीठ टाकून प्यावा.
ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही काही मिनिटांत गाड्यांवर मिळणाऱ्या रसासारखाच ताजा आणि स्वादिष्ट उसाचा रस घरी तयार करू शकता.
पुदिना आणि आल्यामुळे रसाला एक अनोखी चव येते, तर काळे मीठ त्याची चटक वाढवते. बर्फामुळे रस थंडगार राहतो, ज्यामुळे उन्हाळ्यातील तहान आणि थकवा लगेच दूर होतो. याशिवाय, हा रस बनवण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नाही, फक्त तुमच्या स्वयंपाकघरातील मिक्सर पुरेसे आहे.