Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात दुपारी साडेचार वाजता जोरदार वादळ वाऱ्यासह प्रचंड गाराचा पाऊस पडला. यामुळे सोनई मध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तहसीलदार संजय बिरादार यांना तात्काळ सोनई परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महावितरण विभागाला वीज वितरण सुरळीत करण्याबाबत आदेश दिले.
अचानक सोनई परिसरात दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. यानंतर दुपारी साडेचार ते पाच वाजे पर्यंत अर्धा तास प्रचंड वादळ वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला. वादळ वाऱ्यामुळे सोनई परिसरात प्रचंड झाडे उन्मळून जमिनीवर पडली. अनेकांचे पत्रे उडाले. सोनई खाण परिसरात ३३ केव्ही लाईटचे मोठे पोल एल.टी पोलावर पडल्याने मोठे नुकसान झाले. सोनई मध्ये घरावर विजेचे पोल पडले. विजेच्या डी. पी चे मोठे नुकसान वादळा मुळे झाले. यामुळे सोनई परिसरात रात्रभर वीज गायब झाली होती.

सोनई परिसरात झालेल्या वादळ वारा आणि मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. सोनई मधील मुळा कारखाना परिसरात मोठे वादळ झाल्याने अनेक मोठी झाडे पडली.मुळा कारखाना,लांडेवाडी, शनिशिंगणापूर, बेल्हेकरवाडी, हनुमानवाडी, पानसवाडी, झापवाडी आदी परिसरात पण वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले.
शेतकरी वर्गाचे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तसेच सोनई परिसरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ. विठ्ठलराव लंघे यांनी तहसीलदार संजय बिरादार यांना दिले आहेत. तसेच महावितरण विभागाला पण वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याबाबत कामे मार्गी लावण्याबाबत आ. लंघे यांनी सांगितले आहे.