राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २ मार्च रोजी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे राज्यातील सर्वात जास्त तापमान आहे. उष्ण वारे आणि हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवस उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील तापमानवाढीचे कारण
हवामान तज्ज्ञांच्या मते, आग्नेय उत्तर प्रदेशात चक्राकार वारे वाहत आहेत आणि त्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे. या वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, ज्याचा परिणाम म्हणून राज्यभर तापमान वाढत आहे. अनेक भागांत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.

कोणत्या भागात उन्हाचा प्रभाव अधिक ?
पुणे, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. तर, राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे 17 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
कोकणसाठी यलो अलर्ट, विदर्भ-मराठवाड्यात कोरडे हवामान
हवामान विभागाने 3 ते 5 मार्च दरम्यान कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे.
उन्हाच्या लाटेचा पुढील अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला तापमान वाढीचा परिणाम नागरिकांना जाणवणार आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका अधिक जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.