Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली होती. या स्थितीची तीव्रता आता कमी होत असून ती आता चक्रीय स्थितीत आहे. तसेच ती झारखंड आणि लगतच्या भागात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे.
राज्यातील घाटमाथा परिसरात गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी वाऱ्यांची वाढलेली तीव्रता यामुळे राज्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात ऑरेंज तर तुरळक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून
देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास २५ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केली. येत्या पाच दिवसांपर्यंत उत्तर-पश्चिम आणि आजूबाजूच्या पश्चिम-मध्य भारतात मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
देशात यंदा मान्सूनदरम्यान आतापर्यंत सामान्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागांत मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. येत्या २५ सप्टेंबरपासून येथूनच देशातील मान्सूनच्य परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे,
असे हवामान विभागाने म्हटले. मान्सूनच्या माघारीच्या प्रवासात विलंब झाला तर त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेष करून उत्तर-पश्चिम भारतातील रब्बी पिकांना याचा फटका बसू शकतो. भारतात यंदा मान्सूनदरम्यान ७८०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सामान्यतः ८३२.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो.
राज्यातील घाटमाथ्यावरील पावसाची नोंद
ताम्हिणी ५६ मिमी, खोपोली ४२ मिमी, डुंगरवाडी ४० मिमी, लोणावळा ३७ मिमी, शिरगाव ३५ मिमी, कोयना ३२ मिमी, दावडी २८ मिमी, अंबवणे २३ मिमी, वळवण २१ मिमी, भिवपुरी १८ मिमी, वाणगाव १८ मिमी, भिरा १४ मिमी, ठाकूरवाडी १२ मिमी, शिरोटा ८ मिमी आणि खंड ४ मिमी.