Maharashtra News : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या २४ तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी वर्तवली आहे.
तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांत यलो अॅलर्ट वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांत हवामान विभागाने यलो अॅलर्ट देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात लवासामध्ये सर्वाधिक पाऊस
पुणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात लवासामध्ये सर्वाधिक २३.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद केली आहे. त्याखालोखाल लोणावळा ६, निमगिरी ६, गिरीवन १.५, तळेगाव ०.५, बल्लाळवाडी ०.५ आणि पाषाणमध्ये ०.५ मिमी पावसाची नोंद केली आहे.
ताम्हिणी घाट परिसरात ३२ मिमी पाऊस
राज्यात गेल्या २४ तासांत दावडीमध्ये सर्वाधिक ४३ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्याखालोखाल ताम्हिणी घाट परिसरात ३२ मिमी, शिरगाव २५, कोयनामध्ये १७, भिरा १६, खोपोली १०, अंबोने १४, भिवपुरी २, खंड २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.