हवामान बदलाचा फटका; सहा महिन्यात २५०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी

जगभरात झपाट्याने वाढत असलेल्या हवामानबदलाची झळ भारतासह संपूर्ण जगाला बसत असल्याचे चिंताजनक चित्र पुन्हा स्पष्ट झाले आहे. गतवर्षी डिसेंबरपासून झालेला हवामान बदल आणि प्रतिकुल वातावरणाच्या घटनांमध्ये जगभरात ४१ अब्ज डॉलरहून अधिकचे नुकसान झाले आहे. गत सहा महिन्यांतील प्रतिकुल हवामानाशी संबंधित चार घटनांमध्ये २५०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.

हवामान बदलाचा फटका कमी करण्यासाठी श्रीमंत देशांकडून व्यापक प्रयत्न होण्याची गरज एका नवीन अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनस्थित एक स्वयंसेवी संस्थेकडून हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता दर्शविणारा अहवाल जारी करण्यात आला आहे. नुकतीच दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय हवामान बदलावर परिषद झाली होती.

या परिषदेपासून आतापर्यंत प्रतिकुल हवामानामुळे झालेल्या घटनांमध्ये जगाला ४१ अब्जहून अधिकचा फटका बसला आहे. तर गत सहा महिन्यांतील प्रतिकुल हवामानाशी संबंधित चार घटनांमध्ये २५०० हून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या चार घटनांसाठी हवामानबदल कारणीभूत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नुकसानीचा व जीवितहानीचा हा आकडा प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता आहे.

जीवाश्म इंधनाचा वापर थांबविण्यासाठी आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी गरीब देशांचे हात बळकट करण्याची गरज आहे. मात्र, युएईत झालेल्या ‘सीओपी २८’ परिषदेनंतर या दिशेने पाहिजे तशी प्रगती झाली नाही. हवामान बदलासाठी कारणीभूत हरितगृह वायू उत्सर्जनात श्रीमंत देशांचा मोठा वाटा आहे.

यामुळे या देशांनी आपली जबाबदारी लक्षात घेत हवामानबदलाची शिकार ठरत असलेल्या अन्य देशांना यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे. श्रीमंत देशांनी अशा देशांचा निधी वाढविण्याची गरज अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये सेंबरमध्ये दुबईत झालेल्या परिषदेत ‘ग्लोबल साऊथ’ स्थित गरीब देशांसाठी नुकसानभरपाई निधीवर सहमती व्यक्त करण्यात आली होती.

पण या दिशेने अपेक्षेनुसार काम होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार ब्राझीलमध्ये आलेल्या पुरात जवळपास १६९ जणांचा मृत्यू झाला, तर सात अब्ज अमेरिकन डॉलरचे आर्थिक नुकसान झाले.

दक्षिण आणि दक्षिण पश्चिम आशियातील पुरामुळे एकट्या संयुक्त अरब अमिरातमध्ये जवळपास २१४ जण दगावले, तर ८५ कोटी अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले. पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियात तीव्र तापमानामुळे एकट्या म्यानमारमध्ये १५०० हून अधिक लोकांचा बळी गेला. तर उष्माघातामुळे होणाऱ्या बळींची खूप कमी प्रमाणात नोंद केली जाते, असे संस्थेने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe