मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले होते. ८ जून रोजी उपोषणाला बसल्यानंतर आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस होता. दरम्यान आज त्यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ गेले होते. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केले आहे. ‘सगेसोयरे’ अंमलबजावणीसाठी 13 जुलैची मुदत आता या शिष्टमंडळाने मागितली आहे. शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर जरांगेंनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महिनाभराची मुदत दिल्याची माहिती समजली आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले, मराठा समाजाला सरकार आरक्षण देईलच पण तब्येत देखील सांभाळा. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वेळ लागणार असल्याने साधारण महिनाभर तरी वेळ दिला पाहिजे अशी विनंती त्यांनी केली. यावेळी जरंगे पाटील यांनी 30 जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी केली.
अखेर चर्चेअंती सरकारच्या विनंतीनुसार 13 जुलैपर्यंतचा वेळ त्यांनी दिलाय. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री शंभुराज देसाई, नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे व राणा जगजितसिंह हे होते. या शिष्टमंडळास त्यांनी एका महिन्याच्या आत काम करा अन्यथा विधानसभा निवडणुकीला उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यानुसार आता 13 जुलैपर्यंत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
अंतरवाली सराटीत जल्लोष
चर्चेनंतर मंत्री शंभुराज देसाई व संदीपान भुमरे यांनी त्यांना ज्युस पाजले. त्यानंतर त्यांचे उपोषण सुटले. उपोषण मागे घेत असल्याची व झालेल्या चर्चेची घोषणा मनोज जरांगे यांनी करताच अंतरवाली सराटीत जल्लोष करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी देखील नागरिकांनी केली.