Havaman : तापमानात वाढ ! ऑक्टोबर हिट पारा ३४.१ अंशावर

Ahmednagarlive24 office
Published:
Havaman

Havaman : गेल्या काही दिवसात भाद्रपद महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. यावर्षीचा मान्सून जवळपास संपल्यात जमा आहे. ऑक्टोबरची हिट आता जाणवायला लागली असून त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे.

तापमापकाचा पारा 34 ते 35 अंशापर्यंत गेला आहे. बदलत्या हवामानामुळे अनेक जण सर्दी, थंडी, ताप आदी संसर्गजन्य आजाराने नागरिक बेजार झाले आहेत. गतवर्षी शहरात संपूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस होता. त्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली होती.

मात्र, यंदा दोन आठवडे आधीच ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत शहराचे कमाल तापमान २५ ते २६ अंशांवर, तर किमान तापमान १८ ते २१ अंशांवर होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून कमालीचे वातावरण बदलले. कमाल तापमानात एकदम सहा ते आठ अंशांनी वाढ झाली. तापमापकाचा पारा ३४ ते 35 अंशांवर गेला आहे.

शुक्रवारी कोपरगाव शहराचे तापमान ३४.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शहराचा पारा ५ ऑक्टोबरपर्यंत २५ ते २६ अंशांवर होता. गेल्या आठवडाभरात तापमानातील बदल वेगाने झाला आहे. लहान मुलासह, नागरिक, महिला आजारी पडले आहेत. अंग दुखीचे प्रमाण वाढले आहे

गतवर्षीपेक्षा यंदा पावसाची नोंद अतिशय अल्प झाली आहे. मान्सून माघारी फिरल्याने वातावरण कोरडे असून, आता पावसाची शक्यता नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा सरासरीत तब्बल शंभर ते दीडशे मिमीची तूट वाढली आहे.

तालुक्यासह जिल्ह्यात ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. एकीकडे दिवसाचे तापमान वाढत असताना रात्री मात्र तापमान खाली येते. त्यामुळे थोडीफार थंडीची चाहूल लागली आहे

दिवसाचे तापमान वाढत चालल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. पाऊस कमी असल्याने काही भागात टँकर सुरू आहेत. त्याची संख्या जरी कमी असली, तरी भविष्यात टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

देशात परतीच्या मॉन्सूनचे वारे वाहू लागले आहेत. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा जाणार याची चिंता सगळ्यांनाच लागली आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात नेहमी परतीचा पाऊस कोसळत असतो.

मात्र, यंदाच्या वर्षी तशी स्थिती नाही.. सध्या ऑक्टोबर महिना सुरू असून कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, धरणाची स्थिती आता जरी बरी असली,

तरी भविष्यात पाण्याची नियोजन कसे होणार याबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. त्यातच समन्यायी पाणी वाटपाचे भूत नगर नाशिक जिल्ह्याच्या मानगोटावर बसले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe