भारतात वाढत्या AC च्या वापरामुळे लवकरच ओढवणार विजेचे संकट, बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठाने संशोधनातून दिला इशारा

बर्कले विद्यापीठाच्या अभ्यासानुसार भारताने ऊर्जा कार्यक्षम एसीचा वापर वाढवल्यास २०३५ पर्यंत २.२ लाख कोटींची बचत आणि ६० गिगावॅट वीजटंचाई टाळता येईल. दमट हवामान लक्षात घेऊन एसी चाचणी मानके अद्ययावत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Published on -

भारतात पुढील दहा वर्षांत घरगुती वातानुकूलित यंत्रणेची (एसी) ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट केल्यास तीव्र वीज टंचाई टाळता येईल आणि ग्राहकांची तब्बल २.२ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल, असा दावा बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या ताज्या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.

मात्र, योग्य पावले न उचलल्यास वीज गुल (ब्लॅकआउट) होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. भारतातील वाढती एसीची मागणी आणि त्यामुळे वीज पुरवठ्यावर येणारा ताण लक्षात घेता, ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे अत्यंत गरजेचे आहे.

भारताच्या हवामानानुसार बदलाची गरज

संशोधनात भारताच्या दमट हवामानाला अनुसरून एसी चाचणी प्रक्रिया अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात एसी केवळ हवा थंड करण्यासाठीच नव्हे, तर हवेतील दमटपणा कमी करण्यासाठीही वापरले जाते. मुंबई किंवा चेन्नईसारख्या शहरांमध्ये दमटपणा कमी करणे तितकेच महत्त्वाचे आहे, जितके हवा थंड करणे, असे संशोधक निहार शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, “दमटपणा काढून टाकणारे एसी लोकांना अधिक सुखद अनुभव देतात आणि वीजही निम्मीच वापरतात.” त्यामुळे एसीच्या चाचणीत दमट हवामानाचा विचार करणे आवश्यक आहे.

वीज बचतीसाठी धोरणात्मक पावले

अहवालात भारताने किमान ऊर्जा कामगिरी मानके (एमईपीएस) सुधारण्याची शिफारस केली आहे. २०२७ पासून याची सुरुवात करून ‘वन-स्टार’ पातळी आयईईआर ५.० पर्यंत वाढवावी, जी सध्याच्या ‘फाइव्ह-स्टार’ पातळीच्या समान असेल, असे सुचवण्यात आले आहे. दर तीन वर्षांनी ही मानके अधिक कठोर करावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे. या धोरणामुळे २०२८ पर्यंत १० गिगावॅट, २०३० पर्यंत २३ गिगावॅट आणि २०३५ पर्यंत ६० गिगावॅट वीज टंचाई टाळता येईल. ही बचत १२० मोठ्या वीज प्रकल्पांच्या निर्मितीइतकी आहे. संशोधक निकित अभ्यंकर यांनी इशारा दिला की, २०२६ पर्यंत एसीच्या वाढत्या मागणीमुळे वीज पुरवठ्यापेक्षा जास्त मागणी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे गंभीर वीज टंचाई उद्भवू शकते.

वीजेच्या बचतीसाठी उपाययोजना

एसीमुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. जर यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर वीज गुल होण्याचा धोका आहे किंवा महागड्या आपत्कालीन उपाययोजना कराव्या लागतील. “योग्य धोरण आणि नियोजनाने आपण ही परिस्थिती बदलू शकतो,” असा विश्वास निकित अभ्यंकर यांनी व्यक्त केला आहे. ऊर्जा कार्यक्षम एसीचा वापर वाढवल्यास विजेची मागणी कमी होऊन ग्राहकांचे पैसे आणि वीज दोन्ही वाचू शकतात. याशिवाय, वीज निर्मितीवरील ताण कमी होऊन पर्यावरणाचेही रक्षण होईल.

भारतीय उत्पादकांसाठी संधी

भारतातील एसी बाजारपेठ आधीच कार्यक्षमतेकडे वाटचाल करत आहे. अहवालानुसार, सध्या बाजारातील २० टक्के एसी सध्याच्या सर्वोच्च ‘फाइव्ह-स्टार’ पातळीपेक्षा जास्त कार्यक्षम आहेत. विशेष म्हणजे, यात अनेक भारतीय उत्पादकांचा समावेश आहे. “ही भारतीय उत्पादकांसाठी नेतृत्वाची संधी आहे,” असे आयईसीसीचे संशोधक जोस डोमिग्वेझ म्हणाले. भारतीय कंपन्या जर अधिक कार्यक्षम आणि दमट हवामानाला अनुसरून एसी बनवू शकल्या, तर जागतिक बाजारपेठेतही त्यांचा दबदबा निर्माण होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News