Ahmednagar Rain News : अकोले तालुक्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वांचीच तारांबळ उडवून दिली.एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रविवारी सायंकाळच्या सुमारास अकोले शहरात पावसाने हजेरी लावली होती. सहा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर साडेसात विजेच्या सुमारास वादळी वारे आणि विजांचा गडगडाट व पावसाने चांगलीच धांदळ उडाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
अकोले शहरात दूध प्रश्नावर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू असून त्यांचीही पावसाने मोठी भंबेरी उडवून दिली. भंडारदरा परिसरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे.
विजांचा कडकडाट व जोरदार वारा आणि गारपीटीसह पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले. तर इतर ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुर्यदर्शनही तुरळक झाले. याशिवाय पहाटेपासूनच पावसाचे थेंब पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला.
जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हिवाळा व पावसाळ्याचे एकत्र दर्शन झाले.
अजून दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हिवाळी मोसमी व चक्रीय वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.
मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. अहमदनगर जिल्हात देखील पावसाने अनेक शक्यता वर्तविण्यात आली आहे.