Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट येत आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस बरसत आहे. एकंदरीत राज्यात समिश्र हवामान तयार झाले आहे. दुसरीकडे, मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती कायम राहिली तर 31 मे च्या सुमारास मान्सून केरळात दाखल होणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे 28 मे ते तीन जून या कालावधीत यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होणार असे म्हटले जात आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर शेतीकामांनी वेग पकडला आहे. शेतकरी बांधव बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी धावपळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठीची पूर्वतयारी देखील युद्ध पातळीवर सुरु आहे. अशातच राज्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने याचा शेतीमालाला आणि पूर्व मशागतीच्या कामांना मोठा फटका बसत आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील जवळपास 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज आयएमडीने जारी केला आहे.
पण, आज राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी पाऊस होणार असा अंदाज आहे.
तसेच विदर्भ, खानदेश आणि कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळणार आहे. यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात वादळी पाऊस बरसणार ?
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यासंबंधीत जिल्ह्यांना आज आयएमडीने येलो अलर्ट देखील दिला आहे.
तसेच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांना आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे खानदेशातील तिन्ही आणि विदर्भातील अकोला जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.













