Maharashtra News : राज्यात तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला असला तरी उन्हाचा चटका वाढत आहे. त्याचा फटका राज्यातील ४१ जणांना बसला आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी मुंबईत अद्याप एकाही हीट स्ट्रोकच्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
जसजसा एप्रिल महिना सरत आहे, तसतसा उन्हाचा तडाखाही वाढत आहे. कडाक्याच्या उकाड्याने माणसे होरपळत आहेत. अनेक जिल्ह्यांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या ३९ दिवसांत ४१ जणांना उष्माघाताचा झटका बसला आहे.
मात्र, ११ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात यंदा तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक भागात तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यंदा केवळ ३९ दिवसांत म्हणजे मार्चपासून आतापर्यंत ४१ जणांना उष्माघाताची लागण झाली आहे.
२०२३ मध्ये राज्यात उष्माघाताच्या शेकडो रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक ४१२ प्रकरणे रायगडमध्ये नोंदवण्यात आली असून १२ जणांचा मृत्यू येथे झाला आहे. त्याचप्रमाणे वर्धा ३३४, नागपूर ३१७, चंद्रपूर १७७, नंदुरबार १७३, लातूर १६९, मुंबई उपनगर १५५, ठाणे १५३ आणि अमरावती १२४ प्रकरणे आढळून आली आहेत.
मात्र, या ठिकाणी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झाला नाही. यावर्षी मार्च महिन्यापासून बुलढाण्यात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. येथील पाच जणांना याचा फटका बसला आहे. याशिवाय अमरावतीमध्ये ४, कोल्हापुरात ४, नाशिक, पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी ३ रुग्ण दाखल झाले आहेत. उर्वरित बाधित इतर जिल्ह्यांतील आहेत.
मुंबईत उष्माघातग्रस्तांसाठी तयारी
रुग्णालयांमध्ये शीतगृहातील रुग्णांसाठी दोन खाटांची व्यवस्था, औषधांचा पुरेसा साठा तयार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाढत्या तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो.
यामुळे उष्माघातही होऊ शकतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निर्जलीकरण, चक्कर येणे आणि पुरळ यांचा समावेश असू शकतो, जे लाल झाल्यास वेदनादायक असू शकते. – डॉ. कैलास बाविस्कर, सहसंचालक, आरोग्य सेवा विभाग
■ डिहायड्रेशनचा त्रास म्हणजे चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, उलट्या, जुलाबाचा प्राथमिक त्रास होतो. त्यावेळी तातडीने डॉक्टरकडे जावे. अशा रुग्णाला सावलीत बसवावे, नारळपाणी द्यावे. जेवण टाळणाऱ्यांनी जेवण न टाळता हलका आहार घ्यावा. –डॉ. मधुकर गायकवाड, औषध वैद्यक शास्त्र विभाग, जे. जे. रुग्णालय
■ उष्माघातामुळे जर एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यास तातडीने पाणी, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रॉल देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी व्यक्ती बेशुद्ध झाल्यास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. नागपूर किंवा अन्य अति उष्ण ठिकाणी रुग्णालयांमध्ये कोल्ड स्टोअरेज वॉर्ड असतात. तसे वॉर्ड मुंबईत नसल्याने डॉक्टरांनी तातडीने अशा रुग्णांवर उपचार करणे देखील गरजेचे आहे. – डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय