Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. काल तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झाला.
पावसाचे प्रमाण एवढे अधिक होते की काही ठिकाणी रस्ता खचून गेला. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. यामुळे हा घाट पुढील काही दिवस वाहतुकीसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
खरंतर, जून महिन्यात महाराष्ट्रात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता चिंतेत आली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच अधिक पाहायला मिळाले. राज्यातील काही भागात गेल्या महिन्यात जोरदार पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.
आता ऑगस्ट महिन्याची सुरुवातही तशीच झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काही ठिकाणी पावसाचे प्रमाण हे खूपच अधिक राहण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट मिळाला आहे?
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाता परिसरात अति मुसलधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे.
खूपच अति आवश्यक काम असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच संपूर्ण खानदेश म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे.