Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यात पावसाची सक्रियता पाहायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर खऱ्या अर्थाने 17 ऑगस्ट पासून वाढला आहे. 17 ऑगस्ट पासून राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने दणका दिला आहे.
काल देखील राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती असल्याचा अंदाज दिला आहे.
आज राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता आहे. राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पूर्वेकडील तसेच पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील मुंबई, पुणे आणि अहमदनगर सारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे राहणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार पाऊसमान
काल राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाने दणका दिला आहे. आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील बहुतांशी भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
आय एम डी च्या नवीन अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या संबंधित जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, हिंगोली, नांदेड आणि लातूर हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात, मुंबई सह कोकणातील उर्वरित जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.