Maharashtra Rain:- सध्या बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले असल्याने येणाऱ्या दोन दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला असून विदर्भामध्ये त्याचा जोर जास्त राहिला अशी शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये समुद्रसपाटीपासून साधारणपणे साडेसात किलोमीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाला अनुकूल वातावरण सध्या आहे. तसेच मध्य प्रदेश राज्यांमध्ये 15 सप्टेंबर नंतर जे काही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले होते ते आता गुजरात राज्याकडे सरकले असून यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाले होते.
परंतु आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात मध्यम ते जोरदार, कोकणातील काही ठिकाणी जोरदार तर मराठवाडा, पश्चिम उत्तर महाराष्ट्र मध्ये हलका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना आहे पावसाचा येलो अलर्ट?
हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील विदर्भातील बुलढाणा, वाशिम तसेच अकोला व अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली तसेच चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
येणाऱ्या दोन दिवसात कशी राहील पावसाची स्थिती?
आज आणि उद्याचा विचार केला तर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून गुरुवार म्हणजेच 21 सप्टेंबर पासून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून तब्बल 23 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यामध्ये आहे विजासह पावसाची शक्यता
जर आपण मध्य महाराष्ट्रातील नासिक, अहमदनगर तसेच जळगाव इत्यादी जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
विदर्भातील वाशिम, यवतमाळ तसेच अकोला, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यात विजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.