Maharashtra Rain Live updates : चार दिवस पावसाचे ! महाराष्ट्र, कोकणात मुसळधार

Maharashtra Rain Live updates : महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला असून शुक्रवार, कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडला, तर मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात मान्सून सक्रिय आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडला. येथे २६ मिमी, तर सांताक्रुझमध्ये ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तसेच डहाणू २३ मिमी, रत्नागिरी ३१९ मिमी, तर अलिबागमध्ये १२ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात २.५ मिमी, कोल्हापूर २ मिमी, महाबळेश्‍वर ३४ मिमी, नाशिक १३ मिमी, सांगली ०.६ मिमी, तर सातारामध्ये ०.६ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात काही भागात पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये ३५.२, तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वरमध्ये १७ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. कोकण भागात ३ ते ४ जुलैदरम्यान ऑरेंज व यलो अँलर्ट देण्यात आला आहे.

या भागात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस व किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही ऑरेंज व यलो अलर्ट असून काही ठिकाणी अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस, तर विदर्भात बर्‍याच ठिकाणी मेघगजनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

घाटमाथ्यावरही पाऊस सक्रिय असून ताम्हिणीमध्ये १४.२ मिमी, डुंगरवाडी १३ मिमी, दावडी ११.३ मिमी, आम्बोने १०.८ मिमी, कोयना ९.७ मिमी, भिरा ९.९ मिमी, शिरगाव ८.९ मिमी, लोणावळा ७.९ मिमी, खोपोली ७.३ मिमी, वळवण ६.४ मिमी, शिरोटा ६.१ मिमी, भिवपुरी ५.२ मिमी, धारावी ३.४ मिमी, ठाकूरवाडी २.५ मिमी, तर वाणगावमध्ये २.३ मिमी पावसाची नोंद झाली.